भाविनिमगाव जगदंबा माता यात्रोत्सव उत्साहात संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ :  तालुक्यातील श्री क्षेत्र भावीनिमगाव येथे चैत्र पौर्णिमा व हनुमान जन्मोत्सव निमित्ताने होणारा जगदंबा मातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त यात्रा समितीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले.

सकाळी ५ ला भाविक कानिफनाथ मरकड यांनी सपत्नीक श्री जगदंबा मातेला अभिषेक घालून महापूजा पूजा केली. सकाळी आठला उजनी, ओंकारेश्वर येथून आणलेले नर्मदा नदीचे तसेच पैठण येथून पायी आणलेल्या गंगाजलाच्या कावडीची ढोलताशा, सनई, चौघडा, बँड पथका सह मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर हनुमान व जगदंबा मातेल गंगा जलाभिषेक घालण्यात आला.

सकाळी दहा ते अकरा पर्यंत देवीच्या मंदिरात आंबील व हरभऱ्याच्या घुग-या वाटल्या गेल्या. देवीचे आंबील घेतल्याने वर्षभर कुणी आजारी पडत नाही अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे आंबिल घेण्यासाठी मोठी गर्दी झाली. त्यानंतर दुपारी ४ ला दीडतास लिंबाच्या, बाभळीच्या लाकडापासून रखरखीत केलेल्या विस्तवावरून चालत राहाड खेळणे हा नवसपुर्त्ती कार्यक्रम झाला. यावेळी ३०० भाविकांनी रहाडचा नवस फेडला.

काही भाविक डोक्यावर विस्तव घेऊन देवीला प्रदक्षिणा घालतात. याला भंदे म्हणतात. या यात्रेत वेगवेगळे नवस पूर्ण करून पेटीत सढळहस्ते दान टाकतात. काहीजण पेढे तुला करतात, अनेक भाविक चांदीचे घोडे, चांदीचे डोळे वाहतात, सोन्याचे मनी मंगळसूत्र, सोन्याच्या बाळ्या अर्पण करण्याची नवस्फूर्ती करतात.

सायंकाळी ८ते ११ छबिना श्री जगदंबा माते पालखी मिरवणूक काढली. ढोल ताशा लेझीम, बँड पथक, यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, राजश्रीता घुले, डॉ. निवेदिता गडाख, राणी लंके, ॲड प्रताप राव ढाकणे, यांनी श्री जगदंबेचे दर्शन  घेतले.
चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी शेवगाव आगाराने जादा एसटी बस सोडून भाविकांची सोय केली. बुधवारी सकाळी ८ ला हजऱ्या व सायंकाळी ४ला कुस्त्यांचा जंगी आखाडा आहे.