गौतम बँकेच्या सभासदांना ६ टक्के लाभांश– आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे कोपरगाव मतदार संघातील शेतकरी, यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी गौतम सहकारी बँकेची स्थापना केली. नागरी सहकारी बँकांना रिझर्व बँकेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून राष्ट्रीय बँका ग्राहकांना देत असलेल्या सेवा अशा अनेक आवाहनात्मक परिस्थितीतून मार्गक्रमण करून गौतम बँकेने केलेली प्रगती अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार आ. आशुतोष काळे यांनी काढले असून यावर्षी सभासदांना ६ टक्के लाभांश देण्याबरोबरच गौतम बँक ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीने सर्व प्रकारच्या सेवा देणार असल्याचे सांगितले आहे.

सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या व कोपरगाव तालुक्यासह शेजारील तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक गरजा भागवणा-या गौतम सहकारी बँकेची २०२२-२३ या वर्षाची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (दि.१९) रोजी बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकचे चेअरमन सुधाकर दंडवते होते.     

यावेळी बोलताना आ. आशुतोष काळे म्हणाले की, जागतीक महामारीमुळे निर्माण झालेली कॅशलेस व्यवहार प्रणाली आणि त्या अनुषंगाने डिजीटल बँकिंग प्रणालीचे वाढलेले महत्व हे नागरी बँकांना मोठे आवाहन आहे. सुधारित बँकींग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ हा सन २०२० मध्ये सहकारी बँकामध्ये सुधारणा करण्याचे दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सहकारी बँकिंग कायद्यामध्ये अमुलाग्र बदल झालेला असून नागरी बँकांनी कायद्यांमधील तरतुदीनुसार काटेकोरपणे कामकाज करावयाचे आहे.

कोरोना महामारीपासून प्रत्येक बँकेच्या ग्राहकाला कॅशलेस व्यवहाराची सवय लागली असून नागरी सहकारी बँकांना हे आवाहन स्विकारावे लागणार आहे. त्यामुळे गौतम बँकेने देखील हे आवाहन स्वीकारले असून लवकरच गौतम बँकेचे शाखा गौतमनगर व कोपरगाव शाखेमध्ये एटीएम मशीन बसविणार असून नुकतीच रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंग सेवा सुरू करण्यास परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत मिळणाऱ्या ऑनलाईन बँकिंग सेवा देखील गौतम बँकेच्या ग्राहकांना मिळणार आहे. गौतम बँक प्रगतीबरोबरच आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आ. आशुतोष काळे.

तसेच केंद्र शासनाने सहकारावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्रीय सहकार विभाग नव्याने सुरू केलेला आहे. अशा अनेक कारणामुळे निश्चीतच गत आर्थिक वर्ष देखील आव्हानात्मकच होते. अशा परिस्थितीत देखील या सर्व परीस्थितीवर मात करून ग्रामिण भागातील अर्थ व्यवस्था सुधारणेसाठी गौतम बँकेने आपली भुमिका अत्यंत सक्षमपणे निभावली हे सहकार चळवळीच्या दुष्टीने नक्कीच अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील सक्षम बँक म्हणून आजवर गौतम बँकेस अनेक पुरस्कार बँकेस मिळालेले असून सन २०२३ चा राज्य पातळीवरील बॅको ब्ल्यू रिबन पुरस्कार देखील नुकताच जाहीर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर, नासिक, ठाणे, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या गौतम बँकेचे नगर जिल्ह्यात सहा व नासिक जिल्ह्यात एक अशा बँकेच्या एकूण ७ शाखा सक्षमपणे सुरु असून अजून एक शाखा काढण्यासाठी रिझर्व बँकेकडे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच मंजुरी मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला आहे.

दि.३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षात गौतम सहकारी बँकेच्या ठेवी १०६ कोटीच्या पुढे असून ६६ कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना लघु व कुटीर उद्योग व्यवसाय शेती व शेती पूरक व्यवसायासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून जवळ जवळ ४५ कोटीचे कर्ज वितरण करण्यात आले असून, ह्या कर्ज वाटपात सहकारी बँकांमध्ये गौतम बँक राज्यात अव्वल स्थानी आहे.

बँकेची सन २०२२-२३ चे वर्षाअखेरीस गुंतवणूक ५१ कोटी ७७ लाख, ढोबळ नफा ४ कोटी १६ लाख २१ हजार रुपये, तर तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रू.५२ लाख ४८ हजार इतका झालेला आहे. बँकेचे सीआरएआर प्रमाण १७.८९% असून नेटवर्थ १० कोटी ९ लाख इतके आहे. बँकेचे खेळते भांडवल १३० कोटी ७५ लाख ६ हजार इतके आहे. बँकेचे निव्वळ एनपीए चे प्रमाण १.६४% इतके आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ चे आर्थिक स्थितीनुसार बँक रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम बँकेचे (FSWM) सर्व निकष पूर्ण करत आहे. बँकेला अहवाल सालात ऑडीट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे.

बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रिझर्व बँकेच्या नियमांची पूर्तता केल्यामुळे यावर्षी सभासदांना लाभांश देता येणार आहे याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त केले.

सभेच्या अध्यक्षपदाची सुचना कारभारी आगवण यांनी मांडली त्यास डॉ. मच्छिंद्र बर्डे यांनी अनुमोदन दिले. यावेळी आर्थिक वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव बँकेचे व्हा. चेअरमन बापूराव जावळे यांनी मांडला. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सचिन चांदगुडे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, सुनील मांजरे, सुभाष आभाळे, श्रीराम राजेभोसले, शिवाजी घुले, मनोज जगझाप, शंकरराव चव्हाण, श्रावण आसने, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, माजी संचालक नारायणराव मांजरे, वसंतराव दंडवते, बाबुराव कोल्हे, 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, पंचायत समितीचे मा. सभापती अर्जुनराव काळे, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, बँकेचे व्हा. चेअरमन बापूराव जावळे, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण संतोष पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड, कुक्कुट पालनचे व्हा. चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे मॅनेजर मंगेश देशमुख, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे मॅनेजर सुरेश पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बँकेचे अनेक सभासद सहभागी झाले होते. यावेळी संचालक मंडळाच्या वतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी विषय पत्रिकेवरील १६ विषय मांडले त्यास सभासदांनी टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजुरी दिली. प्रास्तविक प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन वरिष्ठ अधिकारी सामान्य प्रशासन नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार संचालक श्रीकांत तिरसे यांनी मानले.