कोपरगावकरांवर हि वेळ कुणी आणली – सुनील गंगुले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० – ४२ कोटीच्या पाणी योजनेत भ्रष्टाचाराला खतपाणी घातले नसते तर आज धरणात पाणी असून सुद्धा कोपरगावकरांवर सहा-आठ दिवसांनी पाणी देण्याची वेळ आली नसती. त्यामुळे कोपरगावकरांवर हि वेळ कुणी आणली याचे आत्मपरीक्षण करा असा तिरकस सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी माजी आमदार कोल्हे यांना विचारला आहे.

 मागील पाच वर्षात केंद्र व राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असतांना देखील केवळ कोपरगावकरांना शक्य नसलेल्या गोष्टींचे स्वप्न दाखविण्यात तुमचा कार्यकाळ आटोपला. सत्ता असतांना त्या सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी करता आला नाही. ४ नंबर साठवण तलावाच्या दुरुस्तीसाठी माजी आ. अशोकराव काळे यांनी २ कोटी निधी आणला होता. मात्र सत्ताधारी आमदार असतांना देखील आपल्याला श्रेय मिळणार नाही या भीतीपोटी आपल्या कुटील राजकारणापायी या २ कोटी निधीतून ४ नंबर साठवण तलावाच्या दुरुस्तीचे काम कोणी होवू दिले नाही हे देखील आपल्या मनाला विचारा.

माजी आमदार अशोकराव काळे यांनी आणलेली ४२ कोटीची पाणी योजना भ्रष्टाचाराच्या विळख्यात कशी गुरफटवली हे देखील कोपरगावच्या सुज्ञ नागरिकांना सांगा. आजही त्या ४२ कोटीच्या पाणी योजनेच्या वितरण व्यवस्थेसाठी टाकलेल्या पाईपलाईन सापडत नाही. त्या पाईपलाईन गुप्त झाल्या आहेत का? हे देखील सांगावे. या ४२ कोटीच्या पाणी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून त्या योजनेच्या ठेकेदाराचा पिच्छा करून कोणते नगरसेवक ठेकेदाराकडून पैसे घेण्यासाठी थेट बँकेत जात होते हे कोपरगाव शहरातील नागरिकांनी पाहिलं आहे.

त्यावेळी आपण विद्यमान लोकप्रतिनिधी असतांना आपण हे सर्व काही थांबवू शकत होता. जर त्यावेळी तुम्ही हि गोष्ट थांबविली असती तर हि ४२ कोटीची पाणी योजना निश्चितपणे चांगली झाली असती. वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर होवून कोपरगावकरांना उपलब्ध पाण्याचे व्यवस्थित नियोजन होवून नियमितपणे पाणी पुरवठा होवू शकला असता. त्यामुळे कोपरगावकरांवर हि वेळ कुणामुळे आली त्याचे प्रायश्चित २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहरातील सुज्ञ मतदारांनी दिलेले आहे.

कोपरगावच्या नागरिकाना नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी साठवण क्षमता वाढविणे गरजेचे असल्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच ५ नंबर साठवण तलावाचा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. त्यावेळी देखील जाणून बुजून ५ नंबर साठवण तलावाला छुपा विरोध कोण करीत होते हे कोपरगावचे नागरिक जाणून आहेत. २०१९ नंतर निवडून येताच दोनच महिन्यात आ.आशुतोष काळे यांनी ५ नं. साठवण तलावाचे काम सुरु करून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून शहरातील जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

मात्र ज्याप्रमाणे ४२ कोटीच्या पाणी योजनेच्या भ्रष्टाचाराला मूक संमती दिली, ४ नंबर साठवण तलावाच्या दुरुस्तीसाठी आलेला निधी परत पाठविण्यात मोलाची भूमिका बजावली, त्याचीच पुनरावृत्ती सध्या सुरु असलेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या बाबतीत देखील होत आहे. त्यामुळे कोपरगावकरांवर नियमित पाणी पुरवठ्यापासून कोण वंचित ठेवू पाहत आहे याचे आत्मपरीक्षण करा असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी माजी आमदार कोल्हे यांना दिला आहे.