शेवगावमध्ये वीजेमुळे जनजीवन विस्कळीत

शेवगाव प्रतिनिधी दि. ०४ : शेवगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून दिवसभर वीज पुरवठा गायब असल्यामुळे, जनजीवन विस्कळीत होत आहे. विजेवर अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या उद्योगांना वीज पुरवठ्यातील सावळ्या गोंधळाच्या कारभारामुळे मोठा फटका बसला असून, शहरातील पाणी वितरण व्यवस्था कोलमडून पडल्याने शेवगावकरांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनाकडून तीन दिवसाची मुदतवाढ जाहीर करण्यात आली होती. परंतू दिवसभर वीज पुरवठा गायब रहात असल्याने, सततच्या सर्वर डाऊनमुळे वाढवून दिलेल्या मुदत वाढीचा शेतकऱ्यांना अजिबात उपयोग झाला नाही. त्यामुळे पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी किमान दोन-तीन दिवस मुदतवाढ मिळावी. अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, तालुका अध्यक्ष मेजर, अशोक भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिले आहे.

या निवेदनाच्या प्रती कृषी मंत्री धनंजय मुंडे, राज्याचे कृषी आयुक्त यांच्यासह सर्व संबंधितांना पाठवण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी नऊ पासून बंद असलेला, वीजपुरवठा संध्याकाळी आठ नंतर सुरू झाला, तर गुरुवारी आधुन मधून विजेचा खेळ सुरु होता.

सध्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज व कागदपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मात्र विज पुरवठ्यातील, सावळ्या गोंधळामुळे अनेकांना गैरसोय सहन करावी लागत आहे.

याबाबत, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, शहराच्या काही भागातील विजेचे रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असल्याने, त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे, हे काम करतांना वारवार सप्लाय बंद करणे, भाग पडते असा खुलासा करण्यात आला.

परिसरात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे अनेकांना त्याचा मनस्ताप सहन करण्याची पाळी आल्याच्या तक्रारी आहेत. वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने उपाययोजना करून, शेवगावकरांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी जनतेतून होत आहे.

ReplyReply allForward