प्रलंबित कामाबाबाद शिवसेनेचा उपोषणाचा इशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि.०५ : शेवगावातील क्रांती चौक ते भगूर रस्त्यासाठी निधी प्राप्त होऊन आज सुमारे एक वर्ष पूर्ण होत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यासाठी कार्यारंभ आदेश असतानाही कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही म्हणून शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्यानी येत्या १२ तारखेपासून तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात शहरातील क्रांती चौक ते भगूर रस्त्यासाठी निधी व कार्यारंभ आदेश प्राप्त असल्याचे नमुद करून म्हटले आहे की,
सदरील रस्त्याचे काम आज तागायत झालेले नाही. तसेच वेळोवेळी आपणास संपर्क साधला असता पाऊस काळात रस्त्याचे कामकाज होत नसल्याची माहिती देऊन या रस्त्याचे काम आपण आजपर्यंत सुरू केलेले नाही.

तसेच ठेकेदाराच्या लाभासाठी आपल्या कार्यालयाकडून त्यास वेळोवेळी मदत होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी हे काम आठ दिवसांच्या आत सुरू न झाल्यास शेवगाव तहसील कार्यालया समोर दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता तमाम शिव सैनिकासह बेमुदत उपोषण केले जाईल. या दरम्यान होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनाच्या प्रती तहसीलदार, आमदार, पोलीस निरीक्षक व शिवसेना जिल्हाप्रमुख बाबू शेठ टायरवाले यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी युवा शिवसेना जिल्हाप्रमुख साईनाथ आधाट, तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, विशाल परदेशी, सोमनाथ कुरुंद, सुमित अकोलकर, अनिकेत पोटफोडे आदीं उपस्थित होते.