शेवगाव तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : शेवगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली असून खरेदी-विक्री संघावर पुन्हा एकदा घुले बंधूंचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.

संचालक मंडळाच्या एकूण १७ जागांसाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जा पैकी १८ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संचालक मंडळाच्या १७ जागांची निवड बिनविरोध झाल्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयातून देण्यात आली.

शेवगाव तालुका खरेदी विक्री संघावर गेल्या अनेक वर्षापासून घुले गटाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील व त्यांच्या पश्चात माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नेतृत्व राहिले आहे. आज सोमवारी मकर संक्रांतीच्या निमित्ताने येथील मारुतराव घुले पाटील जिनींग, प्रेसिंगच्या प्रांगणात राष्ट्रवादीच्या घुले समर्थकाकडून तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी घुले बंधूसह पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले व तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले इच्छुकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. घुले बंधूंनी इच्छुकांसी चर्चा करून त्यानुसार अपेक्षेप्रमाणे खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यात यश आल्याची माहिती मिळाली.
      निवडण्यात आलेले बिनविरोध संचालक- अ वर्ग सहकारी संस्था प्रतिनिधी – तुकाराम शिवराम वडघणे, बाळासाहेब नागोराव विघ्ने, भारत उत्तम मोटकर, अरुण बलभीम ढाकणे, रवींद्र उत्तम भराट, शहादेव भागोजी खोसे, सच्चिदानंद सिताराम फटांगरे, बाबासाहेब रामभाऊ दिवटे, ज्ञानदेव विठोबा पोपळे, एकनाथ बाबुराव मोरे,

ब वर्ग व्यक्तीशः प्रतिनिधी – सुरेश बाजीराव मडके, मिलिंदकुमार दत्तप्रकाश गायकवाड, * महिला प्रतिनधी- सोनाली प्रल्हाद देशमुख, भीमबाई पंडितराव गायके, *अनुसुचित जाती जमाती प्रतिनिधी- महादेव कोंडीबा मगरे * इतर मागासवर्गीय प्रतिनिधी- संजय भगवान नांगरे, *विजा /भज / विमा प्रतिनिधी- तुळशीराम बापूसाहेब खताळ