सर्व धर्मांच्या धर्मगुरुंची रथातुन मिरवणुक काढत संविधानातील एकतेचे दर्शन घडवले

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : कोणत्याही धर्मातील व्यक्तींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असो किंवा शिक्षण, नोकरी, सत्ता, संपत्ती, नाते संबंधापासुन साध्या कामगार, मजुरांना आपल्या न्याय हक्काच्या लढाईत संविधानाचे महत्व अधिक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाचे संविधान कोण्या एका जातीधर्माला अनुसरुन किंवा मध्य ठेवून तयार केले नाही तर ते या देशातील तमाम नागरीकांच्या हितसंबंध व संरक्षणासाठी निर्माण केले आहे.

माञ त्याच संविधानाची खरी ओळख सर्वसामान्य नागरीकांना नाही. आपल्या मुलभुत हक्काचा आधार संविधान आहे याची जाणीव करुन देण्यासाठी कोपरगाव येथील संविधान चौक फाउंडेशनचे संस्थापक नितीन शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी आज संविधान दिना निमित्ताने सर्व धार्मांच्या धर्मगुरुंना रथात बसवून देशाचा तिरंगा फडकावत संविधान रॅली कढत संपूर्ण कोपरगाव सह जिल्ह्याचे लक्ष वेधले.

कोपरगावच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात संविधानाची जनजागृती करणारी रॅली निघाल्याने शहरातील बहुतांश नागरीही या रॅलीत सामील झाले होते. शहरातील टिळकनगर येथील संविधान चौकातुन शनिवारी सकाळी ११ वाजता सविंधान सन्मान रॅलीला सुरुवात करण्यात आली.

फुलांनी सजवलेल्या रथात व उघड्या जीप मध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज बेट आश्रमाचे संत रमेशगिरी महाराज, लुंबिनी उपवनचे भदंत कश्यप, कोपरगाव चर्चचे फादर प्रमोद बोधक, कोपरगाव गुरुद्वाराचे धर्मगुरू बाबाजी हरजितसिंग, मदरसा मिफ्ताऊल ऊलुम खडकी कोपरगावचे मौलाना आसिफ कासमी साहब, ब्रम्हाकुमारी कोपरगाव आश्रमाच्या राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सरलादिदी, शिंगणापूर महानुभाव आश्रमच्या तपस्वी नंदाताई कपाटे महानुभाव या प्रमुख धर्मगुरुंना बसवुन शहरातून वाजत गाजत संविधान रॅली काढण्यात आली.

या भव्य रॅलीत शहरातील विविध ११ शाळेतील तब्बल एक हजार विद्यार्थी, विद्यार्थीं व त्यांच्या शिक्षकांनी सहभाग घेतला होतात. काही विद्यार्थ्यांनी थोर देशभक्तांच्या वेशभूषा करून संविधान रॅलीचे लक्ष वेधले शाळकरी मुलांनी संविधाच्या विविध कलमाचे नागरीकांना महत्व समजावे म्हणून हातात कलम निहाय फलक घेतले होते. टिळकनगर येथुन रॅलीला सुरुवात होवून शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ रॅली विसर्जित करण्यात आली.

या संविधान रॅलीमध्ये संविधान चौक फाउंडेशनचे संस्थापक नितीन शिंदे, नानासाहेब मोरे, सचिन शिंदे यांच्यासह मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, दिनेश कांबळे, सुनिल गंगुले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध जातीधर्मातील नागरीक मोठ्या संख्येने सामिल झाले होते.