आमदार काळेंच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०२ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले, असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

गौतम पब्लिक स्कूलमध्ये नेहमीच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, गौतम पब्लिक स्कूलचा क्रीडा विश्वात मोठा दबदबा असून, असंख्य विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात अतुलनीय कामगिरी केलेली आहे. त्यामुळे इतरही शाळेतील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपले नैपुण्य दाखविण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय फुटबॉल, हॉकी व मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

गौतम पब्लिक स्कूलच्या विस्तीर्ण मैदानावर व निसर्गरम्य वातावरणात शुक्रवार (दि.०४) रोजी सकाळी १०.३० वाजता विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष, नंदकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये १५१ वृक्षांचे वृक्षारोपण माजी विद्यार्थी व पालकांच्या हस्ते करण्यात येत आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमाचा समारोप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शुक्रवार (दि.०४) रोजी होणार आहे. या क्रीडा महोत्सवात विविध शाळांनी सहभाग घ्यावा असे, आवाहन प्राचार्य नूर शेख यांनी केले आहे.