श्रावण मासा निमित्त टेके चॅरिटेबल ट्रस्ट वतीने नदी स्नानाची व्यवस्था

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०२ : सध्या गोदावरी नदी दुथडी वाहत आहे. अशातच अधिक मासही सुरू आहे. यानिमित्ताने वारीसह पंचक्रोशीतील असंख्य महिला दररोज नदीकाठी आंघोळीसाठी येत आहेत. आंघोळीनंतर ओले वस्त्र बदलण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.

सामाजिक बांधिलकी व मानवतेच्या भावनेतून राहुल मधुकरराव टेके चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या सौजन्याने सर्व स्वयंसेवक, स्वच्छता दूत यांच्या अथक परिश्रमातून व सहकार्यातून बुधवार (दि. २) ऑगस्ट २०२३ सकाळी ७ ते १० या वेळेत तात्पुरत्या स्वरूपात, महिलांना वस्त्र बदलण्यासाठी गोदावरी नदीकाठी असलेल्या “ब्रह्मलीन परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज घाट” येथे ग्रीन नेटचा वापर करून छोटीशी व्यवस्था केली. तसेच यावेळी घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली.

या उपक्रमासाठी सरपंच सतिशराव कानडे, सामाजिक कार्यकर्ते तथा स्वच्छतादूत मधुकरराव टेके, सेवानिवृत्त बँक अधिकारी रावसाहेब जगताप, पोस्ट मास्तर संजय कवाडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कवडे, ज्ञानेश्वर जाधव, गोरख जठार, विलास गाडेकर, मनोज जगधने, अशोक नन्नवरे, इंजिनीयर नवनाथ कवडे, पोस्टमन अशोक निळे, सेतू सेवा केंद्राचे संचालक रवींद्र टेके, इकबाल शेख, कदीर शेख, रोहित टेके उपस्थित होते. हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे.. माणसाने माणसाशी माणसासम वागणे…!