शेवगाव प्रतिनिधी, दि.२४ : शहराला दररोज स्वच्छ पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती व सांडपाणी व्यवस्थापन पूर्ववत करा अन्यथा जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने व्यापक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदन अॅड. शिवाजी काकडे, माजी जि. प.सदस्या हर्षदा काकडे यांनी शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना दिले.
यावेळी काकडे म्हणाल्या, शेवगाव शहराची पाण्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. शहराला पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. आजी माजी लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे शेवगावकरावर ही वेळ आली आहे. पाणी वितरण व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आहेत.
हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण तातडीने योग्य ती पाऊले उचलून पिण्याचे शुद्ध पाणी दररोज मिळावे तसेच रस्ते दुरुस्ती व सांडपाणी व्यवस्थापनासाठी योग्य ते नियोजन करावे. अन्यथा शेवगाव शहरातील सर्व स्त्री-पुरुषांना घेवून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता जनआंदोलन केले जाईल. यावेळी मुख्याधिकारी यांनी ८ दिवसात शहराचा पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करू असे आश्वासन दिले.