निवडणुका कालच्या अन आजच्या

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : साधारणतः ४०-५० वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या राजकीय स्थितीमध्ये  मोठा बदल झाला आहे. त्या वेळच्या निवडणुकीतील उमेदवार व कार्यकर्ते देखील वेगळेच होते. आज नेत्याचे तर सोडाच पण त्याच्या आगे मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचीही काय मिजास असते. कार्यकर्त्यांच्या दर्ज्यानुसार त्याच्याकडे चार चाकी वाहन असते.  दीमतीला गाडीच्या पेट्रोल पाण्याची, गाडीत समवेत फिरणाऱ्या त्याच्या सवंगड्याच्या राहण्याची, सामीष भोजन पार्टीची व्यवस्था असते. चार-पाच दशकापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. उमेदवाराकडेच चार चाकी गाडी नसायची असा काळ होता.

शेवगाव, नेवासे मतदारसंघात कॉ. वकीलराव लंघे व लोकनेते मारुतराव घुले पाटील यांची आदर्श लढत झाली होती. यावेळी लंघे यांच्या प्रचारार्थ कॉम्रेड शशिकांत कुलकर्णी. कॉ. कृष्णा पवार,  कॉ. लोखंडे अशी मंडळी भल्या पहाटे उठून शिदोरी बरोबर घेऊन सायकलवर प्रचाराला बाहेर पडायची. दुपारच्या वेळी मग एखाद्या शेतातील घनदाट वृक्षाच्या सावलीखाली अंगत पंगत धरून सर्व डबे फस्त करून मोटेचे खळाळणारे पाणी पोटभर पिऊन पुढच्या प्रचारावर निघायचे. एकेका गल्लीत घुसून बैठका घेऊन प्रचार साधायचा. त्यांच्या अडीअडचणीची विचारपूस करून त्या मार्गी लावणे बाबत नियोजन करायचे असा प्रचार साधला जायचा. रात्री उशिरा आपापल्या घरी उद्याचे नियोजन करून परतायचे. फार दूरवर असल्यास एखाद्या सग्यासोयऱ्याच्या खळवाडीत पिठलं भाकरीचा पाहुणचार घेऊन रात्री परत जवळपासच्या मंडळींना एकत्र करून प्रचार साधायचा असा कार्यक्रम असे.

  अलीकडच्या काळात मतमोजणी नंतर विजयी उमेदवाराला राजधानी गाठायची असते. किंबहुना बहुमताचा अंदाज घेत पक्षाकडूनच आघाडीवर असलेल्या उमेदवाराला पाचारण केले जाते. तो अन्य कोणाच्या गळाला लागणार नाही याची सर्व व्यवस्था करून  शेवटच्या फेरीलाच मतमोजणी स्थळी आलीशान एसी गाडी उभी केली जाते. या पार्श्वभूमीवर येथील भूमिपुत्र माजी दिवंगत राज्यमंत्री बाबुराव भारस्कर यांचे  स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. निकालानंतर विजयी झालेल्या भारस्करांना चक्क गावोगावी दवंडी देऊन शोधावे लागले होते. अखेर शासकीय यंत्रणेने त्यांना शोधून त्यांना उद्या सकाळी मंत्री पदाची शपथ घ्यावयाची असल्याचा निरोप दिला.

भारस्करांनीही रात्रीची रेल्वे पकडून मुंबई गाठली होती. शपथ विधीसाठी जरा बरे कपडे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते, शिवून घ्यायलाही वेळ नव्हता. तेव्हा त्यांनी एका मित्राच्या कपड्यावरच शपथ घेतली. आज ही घटना कल्पनातीत वाटत असली तरी ती सत्य आहे. भारस्करांच्याच बाबतीत आणखी एक आठवण सांगितली जाते. जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी, सामान्य लोकांनीच  निवडणूक हातात घेतली तर काय घडते, हे याचे उत्तम उदाहरण आहे.

  १९७२ च्या निवडणुकीत भारस्करांनी अर्ज भरला मात्र काँग्रेसने काहींच्या आग्रहास्तव प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिली. तेव्हा भारस्करांना वेळेत अर्ज मागे घेता आला नाही ‘तरी त्यांनी शिंदे यांना तोंडी पाठिंबा देऊन  ते निवडणुकीकडे फिरकले नाहीत. आणि शिंदे, भारस्कर आणि आरपीआयचे ओहोळ असे तिघांचे अर्ज राहिले. भारस्कर निवडणुकीकडे फिरकले नाहीत पण कार्यकर्त्यांनी सायकलवर त्यांचा प्रचार करून त्यांना तीन हजार ८६१  मतांनी विजयी केले. माघार घेतलेल्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. आज निवडणुकीवर कोट्यावधीचा खर्च करण्यात येत असल्याचे आपण पहातो. त्यावेळी भारस्कर यांचा खर्च अवधा १००  रुपये होता. आज असे उमेदवार व असे कार्यकर्ते सापडणे मुश्कील आहे.

 आपल्या विरोधी उमेदवार व त्याचे कार्यकर्ते म्हणजे आपले कट्टर शत्रू असल्याची भावना असते. समोरासमोर येणे सुद्धा टाळले जाते. त्यांना काही कारणाने अडचण आली तर ती अधिक वाढावी म्हणून प्रयत्न होतील. मात्र पूर्वीच्या काळी लोक म्हणजे अजब रसायन होते.  माणुसकीचा झरा होते. या संदर्भात अकोले मतदार संघातील प्रसंग प्रशंसनीय आहे.  कॉम्रेड देशमुख आणि यशवंतराव भांगरे यांची लढत होती. राजूरला कॉम्रेड देशमुख यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी फिरत असताना सायंकाळी प्रचार संपल्यानंतर  त्यांची भांगरे यांचेशी गाठ पडली. तेव्हा भांगरे यांनी त्या सर्वांची आस्थेने चौकशी करून जेवणाची देखील व्यवस्था केली. असे उमेदवार अशा वैचारिक निवडणूका आता होणे नाही.