एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी अडसूळ, सचिवपदी लबडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : एसटी कामगार संघटनेच्या  अहमदनगर विभागाचे अध्यक्षपदी रोहिदास अडसूळ व विभागीय सचिवपदी शेवगावचे भूमिपुत्र दिलीप लबडे यांची निवड  झाल्याबद्दल शेवगाव आगाराच्यावतीने रविवारी (दि २६ ) हृद्य सत्कार करण्यात आला.

यावेळी शेवगाव आगाराचे सचिव म्हणून जगन्नाथ पवार यांची निवड जाहीर करण्यात आली. उपस्थित कर्मचारी व मान्यवरांनी नूतन पदाधिकारी अडसूळ, लबडे व  पवार यांचा आगारातील अधिकारी कर्मचारी व विविध संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. इंटक संघटनेचे संजय गीते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कामगार संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून संघटनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचाही सन्मान करण्यात आला.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यात एसटी कामगार संघटनेचा बोलबाला आहे. अनेक कामगार कार्यकर्त्यांनी संघटनेच्या माध्यमातून नेतृत्व करून जिल्ह्यासह राज्यात प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अडसूळ व विभागीय सचिव लबडे हे आपल्या कार्यकर्तृत्वातून जिल्ह्यासह राज्यात प्रभावी कामगिरी करतील व संघटना अधिक भरभक्कम होण्यास मदत मिळेल असा विश्वास  यावेळी अनेकांनी व्यक्त केला.  

विभागीय कार्यालयाचे माजी सचिव प्रवीण ढगे, राहुल जाधव शेवगाव आगारातील संजय धनवडे, लक्ष्मण लव्हाट, गणेश बर्गे, दत्तात्रय गाडेकर, पांडुरंग देशमुख, सुनील रासने, शिवाजी मडके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे,  राहुल वरे यांची उपस्थिती होती. यावेळी  लबडे यांनी एसटी कर्मचारी व कामगार यांच्या हितासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. संजय नांगरे यांनी सूत्रसंचालन केले तर देशमुख यांनी आभार मानले.