अल्पवयीन मुलीची विक्री करणाऱ्या दलालाच्या शेवगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : तालुक्यातील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तीला लग्नासाठी विकणाऱ्या मोहरक्यासह त्याच्या साथीदाराच्या पाच जणांची टोळी शेवगाव पोलिस पथकाने थेट मध्यप्रदेशातून तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने जेरबंद केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली. आरोपींना न्यायालयाने शुक्रवार ( दि२५ ) पर्यत पोलिस कोठडी सुनावली.  टोळीतील दोन दलाल फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

       या बाबत माहिती अशी, तालुक्यातील एका गावात दहावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी जागरण गोंधळासाठी औरंगाबादला गेली होती. मात्र ती घरी आली नसल्याची फिर्याद मुलीच्या आईने १७ नोव्हेंबरला शेवगाव पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार ती मुलगी औरंगाबाद येथे गजानन काशीनाथ बीडे यांच्याकडे जागरण गोंधळासाठी गेल्याची माहिती मिळाली.

पोलिसानी बिडे यांच्याकडे कसून तपास केल्यानंतर बिडे व लक्ष्मण पवार यांनी तीला प्रतापगड ( राजस्थान ) येथील दलाल भवरसिग ठाकूर व लोकेश चौधरी यांच्यामार्फत मध्य प्रदेशातील धमनार तालुका दलिंदा येथे अनिल चौधरी यांचे बरोबर लग्न लावण्यासाठी दीड लाख रुपयाला विकल्याचे निष्पन्न झाले. शेवगाव पोलीस पथकाने दलिंदा पोलिसांच्या मदतीने धमनार येथे जाऊन अनिल चौधरी यांचे घरावर छापा टाकून ती अल्पवयीन मुलगी पोलिसांनी ताब्यात घेतली.

      तसेच टोळीतील दलाल गजानन काशिनाथ बिडे (वय ३५ रा. रोई तालुका अंबड ), लक्ष्मण तुकाराम पवार ( वय ५८ रा. जय भवानी नगर, औरंगाबाद )  अनिल रमेशचंद्र चौधरी ( वय २५ ), मुकेश रमेशचंद्र चौधरी (वय २७ दोघे रा. धमनार तालुका दलींदा, जिल्हा मंदसौर, मध्यप्रदेश ), अर्जुन जगदीश बसेर ( वय २५  रा. मंदसौर मध्य प्रदेश ) या ५ जणांना  ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

      ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक  पुजारी, नेवासेचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस नाईक संतोष काकडे, सचिन खेडकर, ज्ञानेश्वर सानप व वृषाली सानप यांच्या पथकाने केली.