हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्याचा अमोल घोलप यांनी केला निषेध

शेवगाव प्रतिनिधी, दि.१० : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिक्षण तज्ञ, तसेच जिल्ह्यातील निर्भय बनो उपक्रमाचे समन्वयक हेरंब कुलकर्णी यांच्यावरील भ्याड हल्याच्या घटनेचा येथील भ्रष्टाचार निर्मूलन व दारूबंदी अभियानाचे संघटक अमोल घोलप व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. याबाबत घोलप व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन या घटनेची सखोल चौकशी करून दोषीना कडक शासन होईल अशी कारवाई करावी तसेच कुलकर्णी यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे .

तसेच जिल्हा पोलीस प्रमुख ओला यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला सूचना देऊन शाळेच्या परिसरात सुरू असलेले गुटखा, मावा, सुगंधी सुपारीच्या टपऱ्या हटविण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, साहित्यिक असलेल्या कुलकर्णी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची घटना निंदनीय असून याआधी अकोले तालुक्यात दारूबंदीचा लढा प्रभावी पणाने उभारून त्यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे. हल्लेखोरांना शासन झाले नाही तर यापुढे सामाजिक कामासाठी कोणीही पुढे येणार नाही त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी व गुन्हेगारांना कडक शासन होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे या वेळी देविदास हुशार, विशाल भोंडे, राहुल उगले, विठ्ठल मोहिते, रावसाहेब निकाळजे आदींची उपस्थिती होती.