कोपरगांव प्रतिनिधी दि.२१: लम्पी आजाराने थैमान घातल्यापासुन कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजार तळात जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता. माञ सध्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येत्या सोमवार (दि. २६ डिसेंबर २०२२) पासुन कोपरगाव शहरात जनावरांचा बाजार भरवण्याची तयारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने केली असल्याची माहीती बाजार समितीचे प्रशासक तथा सहकार निबंधक एन जी. ठोंबळ व सचिव नानासाहेब रणशुर यांनी दिली आहे.
कोपरगांव बाजार समिती मधील जनावरे बाजार लम्पी आजारामुळे गेल्या ४ महिन्यापासुन बंद होता. अहमदनगर जिल्हयात जनावरांचा लम्पी आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानमुळे मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जनावरे बाजार भरविणे व वाहतुकीस परवानगी दिल्यामुळे कोपरगांव येथील जनावरांचा बाजार सोमवार दिनांक २६ डिसेंबर पासुन पुर्ववत सुरु होत आहे. याची सर्व शेतकरी, जनावरे खरेदीदार व्यापारी यांनी नोंद घ्यावी अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक एन.जी. ठोंबळ यांनी दिली आहे.
कोपरगांव येथील जनावरे बाजार नियमित सुरु होणार असल्याने शेतकरी, पशुपालक, व्यापारी, दलाल व व्यवसायीक यांनी आनंद व्यक्त़ केला आहे. राज्यात व जिल्हयात लम्पी या आजाराने थैमान घातले होते. या आजाराने तालुक्यात देखील थैमान घातले होते जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व प्रतिबंधात्म़क लसीकरणामुळे लम्पी आजार आटोक्यात आला आहे.
बाजार बंद असल्यामुळे जनावरांच्या घरगुती होणा-या खरेदी-विक्री व्यवहारात मोठया प्रमाणात शेतक-यांची फसवणुक होत होती. जनावरांच्या विक्रीची योग्य़ किंमत शेतक-यांना मिळत नव्ह़ती. त्यामुळे बाजार समितीकडे शेतकरी व व्यापारी यांनी जनावरे बाजार सुरु करणे बाबत वारंवार मागणी केली होती. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी अटीच्या अधिन राहुन बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे.
जनावरे बाजारात विक्रीसाठी आणतांना नियमांचे पालन करण्यात यावे. जनावरांच्या कानास टॅग नंबर असणे व इनाफ पोर्टलवर त्याची नोंदणी आवश्य़क आहे. जनावरांचा आरोग्य़ दाखला सोबत बाळगणे गरजेचे आहे. लसीकरण झाल्याची खात्री झाल्याशिवाय जनावरे बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. तरी शेतकरी व खरेदीदार व्यापारी यांनी वरील अटींचे पालन करुन जनावरे बाजारात जनावरे विक्रीस आणावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी केली आहे.