रेणुका माता देवस्थान नवरात्रोत्सवासाठी सज्ज

शेवगाव प्रतिनिधी, दि.१०: श्रीक्षेत्र अमरापुर येथील श्री रेणुका माता देवस्थाना मध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात जय्यत तयारी सुरू असून  श्रीक्षेत्र माहूरगडहून पायी ज्योत आणण्यासाठी येथील ३० भाविक आज मंगळवारी मार्गस्थ झाले. पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके व माजी  नगराध्यक्षा जनाबाई घोडके तसेच प्रा.जनार्दन लांडे व विजया लांडे या पती-पत्नी जोडीच्या हस्ते ज्योतीची विधीवत पूजा व श्री रेणुका मातेची आरती करुन पायी ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना रवाना करण्यात आले. 

यावेळी श्री रेणुका माता मल्टीस्टेटचे प्रवर्तक जेष्ठ अर्थतज्ञ डॉ.प्रशांत भालेराव, पांडुरंग देवकर, श्रीमत घुले, राजेंद्र नांगरे, अश्वलिंग जगनाडे, गणेश गाडे, देवस्थानचे पुजारी तुषार देवा, गजानन वाघ, रविंद्र आढाव, सचिन जाखडे, देव झरेकर, प्रमोद भागवत, सुरेश गाडे, गोरख गाडे ,अनिकेत म्हस्के, सतीश डोंगरे, आदी भाविक उपस्थित होते. येथील संपूर्ण देवस्थान परिसरात पेव्हिग ब्लॉक व हजारो वृक्षराईने नटलेला असून देवस्थानातील सर्व मंदिरांवर नुकत्याच उभारलेल्या तीन मजली भव्य भक्तनिवासावर तसेच परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरु आहे. यंदा घटी बसणाऱ्या भाविक महिलांच्या व्यवस्थेसाठी नवे भक्तनिवास सज्ज झाले आहे.

रविवारी ( दि १५ ) सकाळी आईसाहेबांची महापूजा करून शतचंडी याग व घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. रोज विविध पूजा अर्चनाचे आयोजन असून पाचव्या माळेला गुरुवारी ( दि.१९ ) भगवतीभक्त कै.चंद्रकांत भालेराव यांचे पुण्यस्मरणा निमित्त तारकेश्वर गडाचे महंत शांती ब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांचे जाहीर हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. 

रविवारी ( दि२२ ) सकाळी ९ ला नवरात्री होम आरंभ होईल संध्याकाळी साडेसहाला नवरात्रोत्थापन रात्री ९ ला पूर्णाहुती. रात्री १० ला महाआरती तर सोमवारी महानवमी निमित्त श्रींची महापूजा व सकाळी ९ ते ११ राम महाराज झिजूर्के यांचे जाहीर हरि कीर्तन होणार आहे. साडे अकराला महाआरती व दुपारी ११ ते ४ महाप्रसाद, मंगळवारी ( २४ ) श्रींची महापुजा संध्याकाळी साडेपाचला भगवान परशुराम पालखी सोहळा व सिमोल्लंघन असे कार्यक्रम आहेत.

काही दिवसापूर्वी जागृत अशा या देवस्थानातून दुर्दैवाने काही आभूषणे व चांदीच्या साहित्याची चोरी झाली होती. आईसाहेबांच्या व्यासपिठावर चढून चोरट्यानी त्यांच्या अंगावरील आभूषणे काढली होती. मात्र देवस्थान प्रमुख भगवती भक्तानुरागी डॉ.प्रशांत नाना भालेराव व रेणुका परिवाराची आईसाहेब  चोरट्याना सोडणार नाही अशी श्रध्दा होती. आणि झालेही तसेच चोरटे चतुर्भूज झाले. काही मुद्देमाल हस्तगतही झाला व होत आहे. भालेराव नानांनी त्यासाठी मोठे प्रायश्चित घेतले. त्यांनी चोरीचा तपास लागेपर्यंत व नविन आभूषणे करे पर्यंत आईसाहेबांच्या गाभाऱ्यात प्रवेश केला नाही. आज नव्या आभूषणांसह देवी भाविकांना दर्शन देत आहे. त्यामुळे भालेराव कुटुंबीय व रेणुका परिवार यंदाचा आनंद दिगुणीत झाला असून ४ शारदीय नवरात्रोत्सव अतिशय धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी देवस्थान सज्ज झाले आहे. 

साडेतीन शक्ती पिठापैकी एक पीठ असलेल्या श्री क्षेत्र माहूरच्या श्री रेणुका देवीचे श्री क्षेत्र अमरापूर हे ठाणे असून नवसाला पावणाऱ्या आणि भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या श्री रेणुका मातेचे स्थान म्हणून गेल्या सतरा वर्षांपासून प्रसिद्धीला आले आहे. त्यामुळे राज्या बाहेरूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. तर काही विदेशी भक्तही येथे हजेरी लावतात. यंदाच्या नवरात्रोत्सवात रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे.

”भूक्त्वा भोगान् यथा कामं देवी सायुज्य” या शास्त्र वचनानुसार पूजा केली किंवा करताना पाहिली तरी सारखेच फळ मिळते. म्हणूनच श्री रेणुका देवस्थानात नवरात्रोत्सव काळात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा भाविकानी लाभ घ्यावा.- भगवती भक्ता अनुरागी, मंगल चंद्रकांत भालेराव