महापरिनिर्वाण दिनविशेष
दि. ६ डिसेंबर २०२२ : स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन… महामानवाचे जीवन चरित्र, महान असा कार्याचा परिचय करून देणारे ‘लोकराज्य’ चे विशेषांक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने वेळोवेळी प्रकाशित केले आहेत. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविधांगी पैलूचे दर्शन घडविणारे नामवंत लेखक, पत्रकार आणि अभ्यासकांचे लेख या विशेषांकात आहेत. संग्राह्य व माहितीपूर्ण असे विशेषांक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हे सर्व अंक विनामूल्य उपलब्ध आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष 2016 मध्ये साजरे करण्यात आले. माहिती व जनसंपर्क विभागाने 2015 पासून जयंती व महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने लोकराज्याचे आतापर्यंत 7 विशेषांक काढले आहेत. ‘महामानव आपला आदर्श : आपली प्रेरणा’ हा लोकराज्यचा एप्रिल 2015 चा विशेषांक वाचनीय झाला आहे. कवी यशवंत मनोहर यांची
बाबासाहेबांवरील कविता अंगावर शहारे आणणारी आहे. आंबेडकरी विचारधारेचे अभ्यासक भी. म. कौशल यांच्या ‘विशेष संपादकीय’ तून बाबासाहेबांचे राष्ट्र उभारणीतील योगदानांचा विशेष उल्लेख आला आहे. डॉ.प्रदीप आगलावे यांच्या
लेखातून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब उलगडत जातात. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या लंडन येथील वास्तूंचा परिचय ‘नवे प्रेरणास्थान’ लेखात मिलिंद मानकर करून देतात. शिक्षणाविषयी बाबासाहेबांचे विचार, अर्थतज्ज्ञ बाबासाहेब यांचे भारतीय कर व्यवस्थेविषयी भूमिका, महिलांविषयी असलेले पुरोगामी विचार विविध लेखातून मांडण्यात आले आहेत. ‘ युगपुरूषांच्या आठवणी’ व ‘बाबासाहेबांची तैलचित्रे : वैभवशाली वारसा’ लेखातील माहिती नावीन्यपूर्ण आहे.
‘लोकराज्य’ चा डिसेंबर २०१५ चा विशेषांक ‘महामानवाचे विश्वस्मारक’ विषयावर आहे. २०१५ हे वर्ष देशासाठी व महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट २०१५ महिन्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी लंडन येथे वास्तव्य केलेल्या घराची खरेदी केली. या वास्तूचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लंडन येथे १४ नोव्हेंबर २०१५ रोजी झाले. या वास्तूचे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे स्मारक करण्याची घोषणा ही राज्य शासनाने केली. परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी व इतरांसाठी ही इमारत यापुढे नवी प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या पाच ठिकाणांचा विकास ‘पंचतीर्थ’ म्हणून करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी केली होती. अशा पंचतीर्थांबद्दल विस्तृत लेख या विशेषांकात समाविष्ट करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लेखही देण्यात आला आहे.
डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त एप्रिल २०१६ या महिन्यातील ‘असामान्य: अद्वितीय प्रज्ञासूर्य’ हा लोकराज्य विशेषांक अप्रतिम, संग्राह्य व माहितीपूर्ण झाला आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, आर्थिक धोरणांचे धुरीण, दलितांचे कैवारी, आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार व भाष्यकार, सांप्रदायिक सद्भावना व
सहिष्णुता प्रेरक, अंधश्रद्धेचे विरोधक, महिलांच्या हक्कांसाठी संघर्षरत, प्रखर देशभक्त, झुंजार पत्रकार, संपादक व लेखक, शांतताप्रेमी व अहिंसेचे पुरस्कर्ते, प्रभावी वक्ते, सच्चे लोकशाहीवादी, कामगारांच्या न्याय अधिकारांचे लढवय्ये, प्रखर विज्ञाननिष्ठ, शिक्षणाचे प्रेरणास्तंभ, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागरूक, ज्ञानपुरूष व समताप्रेमी, निस्सीम ग्रंथप्रेमी, विचार स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते आणि उर्जा-जलसंसाधनाचे नियोजक, बाबासाहेबांच्या अशा विविध पैलूंचे दर्शन या विशेषांकातील लेखातून होते. धनंजय कीर, डॉ.नरेंद्र जाधव, डॉ.गंगाधर पानतावणे, अविनाश धर्माधिकारी, श्रीपाद अपराजित, प्रा.अविनाश डोळस, डॉ.प्रदीप आगलावे, रत्नाकर गायकवाड आदी नामवंत विचारवंतांचे लेख या अंकात आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकांड पंडित होते. विविध विषयांवरील त्यांचा व्यासंग अद्भूत असा होता. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कामगार या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी अजोड अशी आहे. त्याचबरोबर त्यांनी
भारतीय शेतकरी आणि शेती याविषयी मूलभूत चिंतन केले. त्यांचे हे विचार आजही तितकेच प्रासंगिक असून त्यातूनच त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. गुलामगिरीत खितपत पडलेल्या आणि अन्याय व अत्याचारांना बळी पडत असलेल्या
भारतीय महिलांना न्याय देण्यासाठी, बाबासाहेबांनी केलेले प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. भारतीय महिलांना आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी त्यांनी बजावलेली कामगिरी मोलाची आहे. ते खऱ्या अर्थाने महिलांचे उद्धारकर्ते होते. बाबासाहेबांच्या या आणि इतर पैलूंवर मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांची विशेष मालिका हे एप्रिल २०१७ च्या
‘क्रांतिसूर्य’ या लोकराज्य विशेषांकाचे वैशिष्ट्य आहे.
‘लोकराज्य’ने डिसेंबर २०१७ चा अंक ‘विदर्भ विकास विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध केला आहे. या अंकात मागील तीन वर्षात विदर्भामध्ये जी विकासकामे झाली आहेत. त्यांचा जन्म आढावा घेण्यात आला आहे. या विशेषांकातच ‘महापरिनिर्वाण दिनविशेष’ म्हणून ज्येष्ठ विचारवंत व लेखक प्रा.दत्ता भगत, डॉ.कमल गवई, नागसेन कांबळे, कृष्णा इंगळे यांचे विशेष लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. महापरिनिर्वाण दिन कसा टाळावा ? हा नागसेन कांबळे यांचा लेख आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे. महापरिनिर्वाण दिन हा दु:खद दिन असल्याने या दिवशी आंबेडकरी अनुयायांनी कोणत्या प्रथा व संकेत
पाळाव्यात याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
‘महामानवास अभिवादन’ या एप्रिल २०१८ च्या लोकराज्य विशेषांकात डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विविध सामाजिक पैलूंवरती मान्यवरांनी विचार व्यक्त केले आहेत. यामध्ये छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांचे सलोख्याचे बंध वर्णिलेला भावस्पर्शी लेख तसेच डॉ.बाबासाहेबांनी विद्युत आणि जल क्षेत्राच्या विकासासंदर्भात मांडलेल्या महत्त्वपूर्ण धोरणांबद्दलची माहिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या कामाविषयीची माहिती, त्यांच्या अलौकिक ग्रंथप्रेमाचे दर्शन करणारा लेख,
डॉ.बाबासाहेबांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या खुर्च्या तसेच महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदेची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा विकास केला जात आहे, या स्थळांविषयी प्रेरणादायी माहिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या अंतर्गत व बाह्यसुरक्षाविषयीचे चिंतन आदी लेखांचा समावेश या विशेषांकात
करण्यात आला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाची संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती या विशेषांकात देण्यात आली आहे.
‘क्रांतिसूर्याला विनम्र अभिवादन’ या शिर्षकाखाली प्रकाशित झालेला ‘लोकराज्य’ चा डिसेंबर २०१८ विशेषांक वाचनीय झाला आहे. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा ‘आपले संविधान, आपले सामर्थ्य…’हा भारतीय संविधानाची महती स्पष्ट करणारा विशेष लेख आहे. डॉ.प्रदीप आगलावे यांनी बाबासाहेबांची सामाजिक लोकशाहीची व्याख्या त्यांच्या लेखात सविस्तर विशद केली आहे. ‘चैत्यभूमी’ वर मागील २० वर्षांपासून अभिवादन कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती’ च्या कार्याविषयी नागसेन कांबळे यांनी ‘नि:स्वार्थ सेवा’ या लेखात माहिती दिली आहे. बाबासाहेबांना चांगला पोशाख वापरण्याची आवड होती. त्यांच्या वेगळ्या पैलू विषयी मिलिंद मानकर यांनी ‘बाबासाहेबांचे पोशाखप्रेम’ या लेखात प्रकाशझोत टाकला आहे.
बाबासाहेबांच्या विविधांगी पैलूंवर आधारित विशेष लेख ‘लोकराज्य’च्या ऑक्टोंबर २००६ ते २०१६ पर्यंतच्या वेगवेगळ्या अंकामधून प्रकाशित झाले आहेत. अभ्यासपूर्ण लेख राज्यातील मान्यवर लेखक, संशोधक, प्राध्यापक, संपादक, पत्रकार यांनी लिहिले आहेत. यातून बाबासाहेबांच्या चतुरस्त्र प्रतिमेची नेमकी व प्रभावीरीत्या ओळख होते. या सर्व लेखांचे संदर्भमूल्य आणि अभ्यासमूल्य लक्षात घेऊन माहिती व जनसंपर्क विभागाने एप्रिल २०१७ मध्ये निवडक लेखांचा समावेश असलेली ‘महामानव’ ही पुस्तिका प्रसिद्ध केली. ‘महामानव’ पुस्तिका राज्यातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयात सशुल्क
उपलब्ध आहे. हे पुस्तक अभ्यासक, संशोधक आणि सामान्य वाचक या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे. बाबासाहेबांचे श्रेष्ठत्व आणि त्यांचे चौफेर व्यक्तिमत्त्व जाणून, समजून घेण्यासाठी हे लेख सहाय्यभूत ठरतात.
दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करतात.