शेवगांव तालूक्यात ६३ हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : शेवगांव तालूक्यात यंदाच्या खरीप हंगामात ६२ हजार ९९७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे कृषी विभागाचे उद्दिष्ट असुन त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असल्याची माहीती प्रभारी तालूका कृषी आधिकारी गणेश वाघ यांनी दिली आहे.

यामध्ये सगळ्यात जास्त पेरा कपाशीचा असून सुमारे ४३ हजार २२० हेक्टर क्षेत्र कपाशी लागवड होणे अपेक्षित आहे. तर त्या खालोखाल तुर ८ हजार ५९० हे. , बाजरी १६४० , मुग २६८२, मका ३१०, उडीद २००, सोयाबिन १८३०, कांदा ३१८ तर इतर कडधान्ये ४२१० हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट आहे.

त्यासाठी  सात हजार ४२२ मेट्रीक टन युरिया , १९०२ मे.टन डीएपी, ११३१ मे. टन एमओपी , २३७३ मे.टन एसएसपी तर ५६३३ मे.टन मिस्त्र खतांची मागणी करण्यात आली आहे. तर कपाशी बियाण्याचे १ लाख ७३ हजार पाकीटे, तुर बियाणे १ हजार क्विंटल , तर बाजरीचे ७० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी मान्सूनचे आगमन उशीराने झाल्यानेआणी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने गेल्या वर्षीचा खरीप हगाम तेवढा यशश्वी झाला नाही. परंतू चालू वर्षी राज्यात मान्सुन जुनच्या पहिल्याच आठवड्यात दाखल होण्याचा आणी  भरपुर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने खरीप हंगाम यशस्वी होईल अशी अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान या आठवड्यात तालूक्याच्या बहुतांश ठिकाणी कमी आधिक प्रमाणात वळवाचा पाउस झाल्याने पेरणी पुर्व मशागतीला वेग आला आहे. बहुतांश शेतकरी टॅक्टरच्या साह्याने नांगरट, मोघडा, पाळी इत्यादी मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी आता बैल परवडत नाही.

चारा पाण्या आभावी बैल संभाळणे कठीण झाले आहे. पुर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान दोन बैल तरी असायचे एकमेकांकडे सहा बैली, आठ बैली आणी चार बैली नांगर धरून नांगरट काढून शेतीची सामुहिकपणे  मशागत केली जाई. मात्र आता ते दिवस राहिले नाहीत.