शेअर मार्केट गुंतवणूकदारांच्या तगाद्याला वैतागून एकाने घेतला गळफास 

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : तालुक्यातील कोळगाव येथील रामदास सुखदेव झिरपे ( वय ३५) या युवकाने गुंतवणूकदाराच्या तगाद्याला वैतागून सोमवार दि. २७ ला पहाटे राहत्या घरा शेजारील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शेवगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  रामदास ‘ up स्टॉक . ‘ या जास्त परतव्याच्या शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या त्याच्या चुलत भावाच्या कंपनीत काम करत होता. त्या कंपनीचा प्रमुख विठ्ठल ताराचंद झिरपे (वय३० ) हा काही दिवसापूर्वी कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून फरार झाल्याने गुंतवणुकदार आता रामदास झिरपे याचेकडे पैशासाठी तगादे करत होते. त्यांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असे त्याच्य नातेवाईकांचे म्हणणे आहे.  

 विठ्ठल  झिरपे आपल्या ‘ U P स्टॉक  या शेअर ट्रेडिंग कंपनी मार्फत शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झाला. त्याच्या कंपनीमध्ये रामदास अकाउंटंट आणि कॅशियरचे काम पाहत होता. लोक या तरुणाकडे विश्वासाने पैसे देत आणि घेत होते. परंतु  बिगबुल विठ्ठल ताराचंद झिरपे हा गाव सोडून परागंदा  झाल्याने त्याचा चुलत भाऊ असलेल्या रामदास झिरपे याचेकडे लोकांनी तगादा लावला होता याच्या दारात लोक आमचे पैसे दे तुझ्या भावाला शोधून आण अशा तक्रारी करत होते. या सर्व प्रकाराला वैतागून आज पहाटे दिनांक २०  मे सोमवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान राहत्या घरा जवळील झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.  

 सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी रामदास झिरपे यांचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर झिरपे उठले असता, घराच्या शेजारच्या लिंबाच्या झाडाला रामदास लटकलेल्या अवस्थेत दिसला. संबंधित घटना पोलिसांना कळविण्यात आल्यावर, पंचनामा करुन शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यावर सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आहे.

रामदास यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मयत रामदास याची मोठी मुलगी निता हीचा दहावीचा निकाल होता. दुपारी अंत्यविधी दरम्यान, ती ८३ टक्क्यांसह उत्तीर्ण झाल्याचे कळाले, मात्र ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी तिचे वडील या जगात नव्हते.

तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणूकदारांना चुना लावून अनेक एजंट कोट्यावधी रुपयांची लूट करुन पसार झाले आहेत. त्यामुळे आर्थिक फसवणूक झालेल्या हजारो लोकांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, तसेच पोलीस, नागरिकांच्या तक्रारी घेत नसल्याने, पोलीस प्रशासनाच्या भूमिके विषयी नागरिकांतून मोठा रोष व्यक्त होत आहे.