उष्माघाताने वानराचा मृत्यू , गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील जोहरापूर येथे उष्माघाताने एक वानराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि २७ ) घडली. उष्माघाताने मरण पावलेल्या वानरावर गावकऱ्यांनी आपल्या घरातील एखाद्या सदस्या प्रमाणे अंतिम संस्कार केले.

  उष्मघातामुळे वानर गेल्या दोन-तीन दिवसांपासून आजारी होते. वानरावर जोहरापूर येथे उपचार ही करण्यात आले, परंतु वानराच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दुर्दैवाने सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. कडक उन्हाळा असल्यामुळे वन्य प्राणी हे मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.

  अलीकडे जंगले कमी झालीत. त्यात पाण्याचेही मोठे दुर्भिक्ष्य आहे . त्यामुळे वानर, बिबटे अशा प्राण्याचा वावर मानवी वस्तीकडे होऊ लागला आहे. हे वानर गेल्या काही दिवसापासून जोहरापूरातच हिंडत असे. त्यामुळे त्याचा लळा ग्रामस्थांना लागला होता. वानरांना आपण हनुमान सेना मानतो. त्यामुळे  गावकऱ्यांनी एकत्र येऊन या वानराचा विधिवत अंत्यविधी केला आहे. वानराला नविन वस्त्रे परिधान करण्यात आली.

स्वर्गरथातून स्वाध्याय हरिनामाच्या व टाळ मृदुगाच्या गजरात या वानराचा अंत्यविधी गावातील हनुमान मंदिराच्या समोर करण्यात आला. यावेळी गावातील लहान, थोर, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांना आपले दुःख अनावर झाले होते. बबन देवा, व राजू देवा यांनी या वानरान मंत्र उपचारात मंत्राग्नी दिला.

 यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक सुभाष लांडे, दिनकरराव बडधे,  विठ्ठलराव उगलमुगले, शिवाजी ढगे, बाळू काका वाघ, मनोज बडधे, एकनाथ ढगे, महादेव उगलमुगले, माजी सरपंच जालिंदर वाकडे, भीमराज उगलमुगले,  रवींद्र उगलमुगले, अशोक सोनवणे, चंद्रकांत वाघ, भास्कर वाघ आदी टाळकरी व भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वानराच्या पुढील उर्वरित  दहाक्रीया आदी विधी देखील ग्रामस्थ करणार आहेत.