ग्रंथ वाचनाने विचार प्रगल्भ होतात – मच्छिंद्र महाराज भोसले

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८: वाचनाने माणसाच्या ज्ञानात भर पडते. विचार प्रगल्भ होतात. म्हणून रोज काही ना काही वाचत राहिले पाहिजे. वाचनाने आपली सारासार विचार करण्याची शक्ति वाढते. म्हणूनच ‘वाचाल तर वाचाल ‘ असे म्हटले जाते. त्यात निश्चीत तथ्य आहे. असे प्रतिपादन मच्छिंद्र महाराज भोसले यांनी केले.

      शिवजयंतीचे औचित्य साधून श्री संत नागेबाबा परिवार  रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत येथील नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या  शाखेत आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन  ह.भ. प.मच्छिंद्र महाराज भोसले यांच्या शुभहस्ते आज मंगळवारी ( दि२८ ) करण्यात आले. यावेळी भोसले महाराज बोलत होते.

     यावेळी नागेबाबाचे शाखाधिकारी शांताराम सुसे यांनी सर्वाचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. सुसे म्हणाले, संस्थेचे संस्थापक कडू भाऊ काळे यांच्या संकल्पनेतून आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती वैचारिक शारीरिक, मानसिक, आर्थिक , सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी नागेबाबा परिवार  सातत्याने कार्यरत आहे.

ग्रंथप्रदर्शन हा त्याचाच एक भाग आहे. या व्यतिरीक्त रक्तदान शिबिर, मोफत अन्नदान सुविधा, अपघाती विमा योजना, वृक्षलागवड संवर्धन, व्याख्यानमाला,यासारखे समाजहिताचे उपक्रम राबविले जातात . ग्रंथप्रदर्शन आजपासून ४ मार्च अखेर सकाळी ९ते रात्री ९पर्यत उघडे रहाणार असून यात विविध प्रकाशनाची सुमारे पाच हजारावर  सकारात्मक व प्रेरणादायी पुस्तके आहेत .सर्वसामान्यांना वाचनाची गोडी लागावी, आणि घ्यायला परवडावे म्हणून कोणतेही पुस्तक फक्त शंभर रुपयात उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती दिली.

         यावेळी प्रभाकर काळे, भास्कर सानप गुरुजी, राजेंद्र शिंपी, भागनाथ काटे यांचे सह असंख्य नागरिकांनी विशेषतः युवक मुलामुलींनी  पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन ग्रंथ खरेदी केली. साईप्रसाद घाडगे नितीन वांढेकर यांनी प्रदर्शनाची व्यवस्था पाहिली. संकेत वारकड यांनी सूत्रसंचलन केले तर गजानन शेवाळे यांनी आभार मानले.