शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : खरिप हंगामात शेतकऱ्यांना बियाण्याचे व खतांचे वितरण व्यवस्थित व विनातक्रार व्हावे यासाठी आपल्या कडील बियाणे व खते आपल्या परिसरातचं कृषी सहाय्यकाच्या उपस्थितीत विकावे. कोणत्याही परिस्थितीत त्याची जिल्हया बाहेर विक्री होता कामा नये. अशा सक्त सुचना तालुका कृषी अधिकारी गणेश वाघ यांनी येथे दिल्या. येथील पंचायत समितीच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात तालुक्यातील निविष्ठा विक्री केंद्र चालकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहूल कदम, मंडल कृषी अधिकारी बाळकृष्ण विघ्ने, कृषी पर्यवेक्षक सुखदेव जमधडे, दत्ता बुचकूल, कृषी अधिकारी सारंग दुगम, रामकिसन जाधव, गौतम फाजगे, दिगंबर भांड, कैलास हिरे, निविष्ठा विक्री केंद्र चालक बंडू सागडे, सुधाकर जावळे, तुळशीराम विघ्ने यांचेसह तालुक्यातील सुमारे ७० कृषीसेवा केंद्र चालक उपस्थित होते.
पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम म्हणाले, बियाण्याची विक्री निर्धारित भावानेच करावी. कोणतेही बियाणे वाढीव भावाने विक्री करू नये. अधिक भावाने विक्री केल्यास निविष्ठा विक्री केंद्र चालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. साठा फलक व साठा रजिस्टर अद्यावत ठेवावे. पॉस मशीनवर शेतकऱ्यांच्या अंगठ्याचा ठसा घेऊनच खत विक्री करावी.
यावेळी शेतकऱ्यांनी एकाच वाणाच्या बियाण्याचा आग्रह धरू नये. तसेच पुरेशी ओल नसताना पेरणीची घाई करू नये. बियाणे कंपन्यांनी देखील लवकरात लवकर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करावे. यासंदर्भात उद्बोधन होणे आवश्यक असल्याची मागणी कृषी सेवा केंद्र चालकांनी केली. जगदीश धूत यांनी आभार मानले.