मृगाच्या पावसाची जोरदार हजेरी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० :  रविवारी (दि. ९) शेवगाव तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र मृगाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली पर्जन्य राजा प्रसन्न होऊन येता झाला. या भावनेने येथील  शेतकरी वर्ग सुखावला आहे. गेल्या वर्षी राज्यभर  पावसाची अवकृपाच होती.

बहुतेक भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला.  बांध बंधारे, धरणे  भरली  नाही. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी घटली. विहिरींनी तळ गाठले, बोअर कोरडे पडले, अन् पाण्याचे दुर्भिक्ष भेडसावू लागले. तालुक्यात चौदा टँकर तहानलेल्याची तृषा भागविण्यासाठी तैनात करण्यात आले असतांनाच रोज टँकरची मागणी होऊ लागली होती. जनावरांच्या चाऱ्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली.  रोज पावसाचे तर्क वर्तविले जात. तरी ही  रोहिणी नक्षत्र देखील कोरडेच गेले.

मात्र ७ जूनला मृग नक्षत्राचे तुरळक आगमन झाले आणि रविवारी ९ जून ला तर तालुक्याच्या शेवगावसह सर्वच मंडलमध्ये, शहरटाकळी, दहिगाव ने, ए रंडगाव, ढोरजळगाव, अमरापूर, आव्हाणे, बोधेगाव, बालमटाळी या भागात मृगाच्या ‘ पावसाने दमदार हजेरी लावली.

शेतकऱ्यांनी  शेती मशागतीची कामे अगोदरच उरकली असल्याने खरिप पेरण्यास वेग येणार आहे. ठिकठिकाणची  कृषि सेवा केंद्र सज्ज झाली असून शेतकऱ्याची बी भरणाची लगबग सुरु झाली आहे. परिसराचा कपासी, तूर, उडीद,मुगाच्या पेरणी वर मोठ्या प्रमाणात भर असतो. कपासीच्या वाढत्या पेरणी मुळे  शेवगाव हे कपासी उपादनात गेल्या अनेक वर्षापासून राज्यात  आघाडी वर आहे यंदाही तालुक्यात किमान ४५ हजारावर हेक्टर  क्षेत्रात कपासीचा पेरा होणार आहे.