शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी उत्पादन वाढ शक्य – डॉ. कौशिक

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञान व नवनवीन यशस्वी प्रयोगांचा अवलंब शेतीत केल्यास एकरी नफा व उत्पादन वाढीस मदत होते असे प्रतिपादन दहिगावने कृषी विज्ञान केद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केले.

       कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली च्या ९५ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित तीन दिवसीय तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी  ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी, श्रीरामपूर यांचे अधिनस्त राहुरी, श्रीरामपूर, नेवासा व शेवगाव या चार तालुक्यातील कृषि सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. नारायण निबे यांनी आपत्कालीन पिक नियोजना बद्दल तर माणिक लाखे यांनी विविध खरीप पिकांवरील किडी व रोगांचे व्यवस्थापनाबद्दल  मार्गदर्शन केले. 

यावेळी श्रीरामपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी अमोल काळे म्हणाले, क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारी यांनी प्रशिक्षणातून प्राप्त ज्ञानाचा वापर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी करावा. सर्व प्रशिक्षणार्थीना केव्हीके दहिगाव- ने प्रक्षेत्रावरील विविध तंत्रज्ञान प्रात्यक्षिके जसे बी.बी.एफ. द्वारे पेरणी केलेले सोयाबीन व बेड वरती तूर, बी.बी.एफ. द्वारे पेरणी केलेले तूर व मुग आंतरपीक, ब्रीडर फुले ०२६५ ऊस प्लॉट, बी.बी.एफ. द्वारे पेरणी केलेले सोयाबीन फुले दुर्वा, गोदावरी तूर बियाणे प्लॉट, पोषण बाग व कृषि प्रदर्शन दाखविण्यात आले.

शिबीर यशस्वी करण्यासाठी केव्हीके दहिगावनेचे सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, राहुल पाटील, डॉ. चंद्रशेखर गवळी, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट यांनी प्रयत्न  केले.