शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या गुरुवारी (दि. २३) मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या महाविराट जाहीर सभांचे शेवगाव व बोधेगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणच्या संयोजन समितीने उत्कृष्ठ नियोजन केले असून दोन्ही ठिकाणी किमान एकेक लाखांवर उपस्थिती राहिल असे नियोजन आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे यांनी राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. सध्या त्यांचा राज्यात तिसरा झंझावाती दौरा सुरु असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांच्या सर्व संभांना अलोट गर्दी होत आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता शेवगाव येथे व त्यानंतर दुपारी तीन वाजता बोधेगाव येथे त्यांच्या महाविराट सभा आहेत.
जरांगे यांच्या प्रवास मार्गावरील तालुक्यातील गावात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होणार असून भातकुडगाव फाट्यापासून मोटार सायकल रॅली सह त्यांचे शेवगाव शहरात आगमन होणार आहे. त्यानंतर येथील पाथर्डी रस्त्यावरील साई लॉन्स मंगल कार्यालयात जाहीर सभा आहे. जरांगे यांच्या सभेपूर्वी दुपारी १२ ला मराठा आरक्षणाबाबतचे गाढे अभ्यासक योगेश केदार व प्रदीप सोळंकी या उभयतांची अभ्यासपूर्ण व्याख्याने होणार आहेत.
यासभेला महिला व ज्येष्ठ वृद्धांसाठी स्वतंत्र बैठकव्यवस्था करण्यात आली असून सभास्थळी पाणी व वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही सभांसाठी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.