डॉ. आंबेडकर यांचे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशासाठी योगदान – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चार तत्त्वांवर आधारित जगात आदर्श असे भारतीय संविधान लिहून आधुनिक भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशासाठी आणि दीन-दलित, वंचित, शोषित व उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. डॉ. आंबेडकर यांचा मानवतेचा विचार पुढे नेणे ही आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. नंतर त्यांनी बुद्धिस्ट यंग फोरम (फोर्स) ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाचे भूषण आहेत. ते महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय किर्तीचे कायदेतज्ज्ञ, अभ्यासू असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी समाजातील दीन-दलित, उपेक्षित व वंचित लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी व सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर लढा दिला. शोषित, वंचित लोकांना ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा महामंत्र देऊन त्यांच्यात स्वाभिमान जागृत करण्याचे काम त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या देशावर खूप मोठे उपकार असून, त्यांनी लिहिलेले भारतीय संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे. आज भारत देश ज्या वेगाने प्रगतीकडे वाटचाल करतोय त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने घालून दिलेल्या नीतीमूल्यांचा मोठा वाटा आहे. माणुसकी जपा, मानवता धर्म जपा, माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे, असा अनमोल विचार मांडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात एकता, समता व बंधुतेचा पाया रचला.

भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे नेत, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या मंत्रानुसार देशातील शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी काम करत आहेत. आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचे विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. तीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे त्या म्हणाल्या.

यानिमित्त बुद्धिस्ट यंग फोरम (फोर्स) ने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या साईबाबा ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास स्नेहलताताई कोल्हे यांनी भेट देऊन स्वत: रक्तदान केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत समर्पित भावनेने कार्य केले.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, बुद्धिस्ट यंग फोरम (फोर्स) ने रक्तदान शिबिराचे आयोजन करून एक चांगला उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी फोरमचे अध्यक्ष विजय त्रिभुवन, उपाध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष राजू उशिरे, सल्लागार साहेबराव कोपरे, सचिव राहुल खंडीझोड, मनोज शिंदे, राजेंद्र पगारे, सोमनाथ खंडीझोड, संजय विघे, संजय दुशिंग, भारत सदर, रवींद्र धीवर, नानासाहेब रोकडे, गणेश पवार, महेश दुशिंग व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारुणकर, राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, स्वप्नील निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, रिपाइंचे प्रदेश सचिव दीपक गायकवाड, माजी नगरसेवक बबलू वाणी, जितेंद्र रणशूर, संजय जगदाळे, दिनेश कांबळे, रवींद्र रोहमारे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, टाकळीचे सरपंच संदीप देवकर, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, सुशांत खैरे, सोमनाथ म्हस्के, अल्ताफभाई कुरेशी, सद्दामभाई सय्यद, खलिकभाई कुरेशी, फकिर मोहम्मद पैलवान, शफिकभाई सय्यद, प्रसाद आढाव, सचिन सावंत, विजय चव्हाणके, सलीम पठाण, बापू पवार, राजेंद्र लोखंडे, सतीश नरोडे, शंकर बिऱ्हाडे, सोमनाथ ताकवले, गोरख देवडे, रोहिदास पाखरे, सुजल चंदनशिव, सतीश चव्हाण, जयप्रकाश आव्हाड, अंकुश जोशी, रुपेश सिनगर, फकिरा चंदनशिव, संतोष नेरे, महेश गोसावी, नंदू केकाण, शाहरुख शेख, रोहण दरपेल, हाशमभाई शेख, श्याम आहेर आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.