शेवगाव प्रतिनिधी, दि. ६: शेवगाव शहराच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विविध अडचणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी घेतलेल्या बैठकीत ठेकेदारासह संबंधित सर्व एजन्सीना चांगलेच धारेवर धरले. या दीर्घकाळ प्रलंबित योजनेचे काम १५ दिवसाच्या आत तातडीने सुरु करण्याच्या सक्त सूचना देऊन वेळेत काम सुरु न झाल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी कडक तंबी दिली.
काल मंगळवारी (दि ५) जिल्हाधिकारी सालीमठ यांनी शेवगावच्या नवीन पाणी पुरवठा तातडीने चालू करण्या संदर्भात बैठकीत सक्त आदेश देत या कामाच्या प्रगतिचा अहवाल आपण वरचेवर घेणार असल्याचा दिलासा देखील शेवगावकरांना दिला.
यावेळी बैठकीसाठी शेवगाव नगरपरिषदेचे प्रशासक प्रांतधिकारी प्रसाद मते, मुख्याधिकारी सचिन राऊत, नगरपरिषदचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मुंगसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, पाणी पुरवठा योजनेचे तांत्रिक सल्लागार मानव कन्स्ट्रक्शन धुळे (सनेर) व योजनेचे वादग्रस्त ठेकेदार इंद्रायणी एजन्सीचे संजीव कुमार, प्रमुख तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जाजू, भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, माजी सरपंच सतीश लांडे पाटील, अशोक शेठ अहुजा, अजय भारस्कर, अंकुश कुसळकर, दिगंबर काथवटे नितीन दहिवाळकर, विनोद मोहिते, विधिज्ञ शाम कणगरे व पत्रकार अविनाश देशमुख आदी उपस्थित होते.
शेवगाव शहरात बारा-पंधरा दिवसातून एकदा होणारा नळ पाणी पुरवठाही अल्पकाळ होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहराच्या विविध प्रभागातील महिला कार्यकर्त्यांनी नुकतेच योजनेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल प्रभावी आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह सर्व संबंधितांना चांगलेच धारेवर धरले होते.
येथे पाण्यासाठी रोजच कोणाचे ना कोणाचे तरी विनंती, अर्ज, निवेदने, उपोषणे, आंदोलने चालू असतात याची जिल्हाधिकार्यांनी दखल घेत, रखडलेली ही पाणीपुरवठा योजना ताबडतोब सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याच्या सुचना देऊन त्यात दिरंगाई झाल्यास मग तो कोणीही असो त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी तंबी देऊन आपण स्वतः प्रत्येक महिन्याला कामाचा आढावा घेतला जाईल असा दिलासा दिला.