शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : तालुक्यातील जोहरापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अर्जुन रत्नाजी पालवे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. कै.पालवे ‘अण्णा ‘ या नावाने परिचित होते.
अहमदनगर कॉलेजमध्ये हॉलीबॉल आणि कुस्तीचे ते चॅम्पियन होते. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांची रुची होती. जोहरापूरचे सरपंच म्हणून तसेच गावच्या महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियान समितीचे अध्यक्ष पद भूषवून गावाला दोन लाख रु. पारितोषिक मिळवून दिले. १९७२ च्या जिल्हा दुष्काळ निवारण आणि रोजगार हमी समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले.
शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून उत्कृष्ठ कामगिरी केली. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणारे नेते अशी त्यांची जिल्हाभर प्रतिमा होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मधुकर व प्रा.शरद पालवे ही दोन मुले, सुना, चार मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.