शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : शेवगाव पोलीसांनी तत्परता दाखवत, बहुचर्चित शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात शेवटी तालुक्यातील गदेवाडी येथील इन्व्हेस्टींग डॉट कॉम या नावाने शेअर ट्रेडिंग करणाऱ्या दोन सख्या भावांच्या विरोधात, गुरुवार (दि.१३) रोजी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, इतर एजंट नॉट रिचेबल झाले. तर काहीं लगेच गायब झाले आहेत.
विविध गावात शेअर ट्रेडिंग करणारे परिसरातील अनेक एजंट, नागरिकांची फसवणूक करुन फरार झाले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेले नागरिक हवालदिल झाले आहेत. आता गुन्हा दाखल झाल्याने, फसवणूक झालेल्या नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळाला असून फसवणुकीचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील कित्येकांची, हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता असून वीज मंडळ, महसूल व पोलिस प्रशासन एवढेच काय अनेक राजकीय क्षेत्रातील उच्च पदस्थ देखील अधिक परताव्याच्या मोहाला बळी पडले आहेत.
शेवगाव पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक धनवडे ( रा. गदेवाडी ता. शेवगाव ) या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन, तालुक्यातील गदेवाडी येथील इन्व्हेस्टींग डॉट कॉम नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्या अक्षय मेशोक इंगळे, अविनाश मेशोक इंगळे या दोन बंधूंच्या विरोधात, गावासह आसपासच्या गावातील २६ लोकांची, ८३ लाख १० हजार रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मध्ये म्हटले की, दि.१० फेब्रुवारी २४ रोजी अक्षय इंगळे हा फिर्यदीच्या घरी गेला. त्यावेळी त्याने तो व त्याचा भाऊ अविनाश इंगळे या दोघांनी गावात इन्व्हेस्टींग डॉट कॉम नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग ऑफीस सुरु केल्याचे सांगितले. त्यावेळी अक्षय याने तुम्ही आम्हाला तुमचे पैसे द्या. तुम्ही जर आम्हाला पैसे दिले, तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला १२ टक्के प्रमाणे व्याज देऊ, असे अश्वासन देवून माऊली धनवडे यांचा विश्वास संपादीत केला. विश्वास ठेवून धनवडे यांनी, दि.१३ फेब्रुवारी २४ रोजी अक्षय इंगळे व अविनाश इंगळे यांच्या ऑफीस मध्ये जाऊन, बचत गटातील मिळालेले दिड लाख रुपये रोख व ५० हजार रुपये फोन पे द्वारे अक्षय इंगळे याच्या फोन पे नंबरवर ट्रान्सफर केले. असे एकूण दोन लाख त्यांना दिले.
त्यावेळी अक्षय इंगळे याने पैसे मिळाल्याच्या पावत्या धनवडे यांना दिल्या. यावेळी चांगला परतावा देऊ असे सांगितले. त्यानुसार पहिल्या महिन्यात परतावा म्हणून २४ हजार रुपये दिले. परंतू दुसऱ्या महिन्यापासून परतावा देण्यासाठी टाळाटाळ केली. ते दोघे, परतावा देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने धनवडे यांनी गुंतवलेल्या पैश्यांची मागणी केली. तेंव्हा त्याने टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे दिली. धनवडे हे १४ फेब्रुवारी रोजी अक्षय इंगळे याच्या कार्यालयात गेले असता ते बंद दिसले. त्यावेळी तिथे जमलेल्या लोकांकडून समजले की, अक्षय इंगळे व त्याचा भाऊ अविनाश इंगळे हे परिवारासह घर व ऑफीस सोडून लोकांचे पैसे घेवून पळून गेले आहेत, असे नमुद केले आहे.
यांची झाली फसवणूक –
गणेश लक्ष्मण मडके, राम बाबासाहेब डुकरे, चंद्रभान जगन्नाथ नाचन, छबुलाल हुसेन शेख, अशोक मुरलीधर इसरवाडे, स्वप्नाली रामेश्वर जाधव, ( सर्व रा. गदेवाडी ), सावळेराम भाऊराव पायघन ( रा.आखेगाव ) या सर्वांची प्रत्येकी १ लाख रुपये. तर दत्तु भानुदास नाचन, संभाजी नारायण कुलाडे, शंकर बाबासाहेब मडके, संभाजी ज्ञानदेव नाचन, (रा.गदेवाडी ) यांची प्रत्येकी २ लाख. रामेश्वर चांगदेव मडके, योगेश रावसाहेब धनवडे, मोहन दत्तात्रय कातकडे, यांची प्रत्येकी अडीच लाख रुपये. याशिवाय मिठुभाई इमाम शेख ५० हजार, अशोक सुभाष नाईक व सोमनाथ मोहन मडके यांची ८ लाख ९० हजार, अशोक भिमराव गहाळ ३ लाख,बाळासाहेब भगवान धनवडे १२ लाख ५० हजार, कालिदास आसाराम गायकवाड १ लाख ७० हजार, भगवान एकनाथ तिळवणे १ लाख ३० हजार, सोमनाथ विठ्ठल मडके ५ लाख, मारुती बाबुराव विघ्ने २ लाख २५ हजार, संजय सुधाकर जोशी ८ लाख ५ हजार, आप्पासाहेब पुंजाराम पायघन १ लाख ६५ हजार, अरुण विजय निळ ७ लाख, प्रशांत भास्कर शिंदे याची ६ लाख ७५ हजार रुपये, अशा रकमा आहेत.
शेअर मार्केट ट्रेडिंग मधील दाखल झालेला हा केवळ हिमनग आहे. हा व्यवसाय माणसाच्या लोभाचा परिपाक आहे. अधिक परताव्याच्या हत्यासापोटी हजारो जण गुरफटले गेले तसेच सुरवातीला ज्या चार-सहा जणांनी तो व्यवसाय सुरु केला, अल्पावधीत ते मालामाल झाल्याचे पाहून तसेच त्यांच्याकडे कामाला असलेल्यांनीही तो व्यवसाय स्वतंत्रपणे सुरु केल्याने या व्यवसायाचे मोठे जाळे निर्माण झाले. पैसे गुंतवणुक दारांची संख्या वाढती असल्याने सुरवातीच्य काळातील गुंतवणुकदारां ना पैसे मिळालेही. त्यामुळे हेच लोक त्यांचे प्रचारक झाले होते. आज मात्र सर्वच जण परागंदा झाल्याने गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले आहे. अनेक राजकीय क्षेत्रातील उच्च पदस्थ देखील अधिक परताव्याच्या मोहाला बळी पडले आहेत. ही रक्कम काही हजार कोटीवर जाऊ शकते. एका शेअर ट्रेडिंग बीगबुलकडे आमदार, खासदार व मंत्र्यानी देखील कोट्यावधीची गुंतवणूक केली असल्याची येथे दबक्या आवाजात चर्चा आहे !