अवैध कत्तलखाने जमीनदोस्त शहर पोलीस व नगरपालिकेची संयुक्त धडक कारवाई

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : शहरातील  संजयनगर, आयेशा काॅलनी  भागातील अवैध कत्तलखाने, अतिक्रमणे कोपरगाव नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तिकरित्या  केलेल्या धडक कारवाईत उध्वस्त करण्यात आले. या धडक कारवाईंचे सकल हिंदू समाजाच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.

 सोमवारी  संजयनगर,आयेशा काॅलनी या भागात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने काटवणात जनावरे बांधून ठेवण्यात आली होती. सहा जनावरे व पाचशे किलो गोमांस जप्त करण्यात आले होते. तसेच सदर ठिकाणी दोन गोवंश जातीच्या जनावरांची धारदार शस्त्राने कत्तल करण्यात आली होती. त्याचे व्हिडिओसह, फोटो व्हायरल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी शकील बागवान नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

शहरातील मध्यवर्ती भागात वारंवार गोवंश कत्तल केली जात असल्याने सकल हिंदू समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या जातात. अखेर बुधवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढुन आपला निषेध  व्यक्त करुन २४ तासाच्या आत सदर भागातील अवैध कत्तलखाने उध्वस्त करावे अशी जोरदार मागणी नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे केली.

त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नगरपालिका प्रशासन, अतिक्रमण विभाग व शहर पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाच्या मदतीने कडक बंदोबस्तात अकरा वाजेच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने सदर अवैध कत्तलखाने, काटवण जमीन दोस्त केले.

या कारवाईच्या वेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह दंगल नियंत्रण पथक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगाव नगरपालिकेचे २० कर्मचारी, नगररचना विभागाचे तीन अधिकारी यांच्यासह दोन ट्रॅक्टर व दोन जेसीबीच्या सहाय्याने सदर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी दिली.