कापसाला १२ तर तुरीला १० हजार रु. भाव द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन – कॉ. लांडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : कापसाला १२  तर तुरीला १० हजार रूपये प्रति क्विंटल भाव देवून अतिवृष्टीग्रस्त सर्व शेतक-यांना शासनाने जाहिर केलेले अनुदान त्वरीत संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर अदा करावेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सचिव कॉ.सुभाष पाटील लांडे  यांनी दिला आहे.

या संदर्भात त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशातील भाजपाच्या मोदी सरकारने कापसाची परदेशातून आयात केल्याने तसेच व्यापार्यांच्या संगनमताने कापसाचे भाव घसरले आहेत. देशातील सरकारने शेतकरी विरोधी धोरण घेतल्याने शेतक-यांना आपल्या पिकाला मिळणाऱ्या हमीभावापासुन वंचित रहावे लागत आहे.

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे असतांना आजवर कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली आहे.

अशावेळी  शेतक-यांच्या कापसाला किमान १२ हजार  व तुरीला १० हजार रूपये प्रति क्विंटल भाव द्यावा. तसेच अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात  देण्यात आलाआहे.  नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी निवेदन स्वीकारले.

     यावेळी भाकप राज्य कोन्सील सदस्य कॉ.संजय नांगरे, कॉ.भगवानराव गायकवाड, कॉ.दत्ता आरे, कॉ.बबनराव पवार, कॉ.बबनराव लबडे, कॉ.गोरक्षनाथ काकडे, कॉ.राम लांडे, कॉ.कारभारी शिंदाडे, कॉ.काका झिरपे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.