कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पंचनामे करून तीन महिने उलटले तरी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, सन २०२२ मध्ये जुलै ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीने खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, कापूस, मका, कांदा, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. सलग चौथ्या वर्षी कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
परतीच्या पावसाने २० ऑक्टोबर २०२२ रोजी अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. शेतशिवारातील उभी पिके वाहून गेली. काढणीस आलेली पिके शेतातच सडून गेली. त्याची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यापूर्वीच घेतला आहे.
त्यानुसार सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी अनुदान मंजूर केले आहे. त्याची रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे सौ स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे.