गांधी जयंती निमित्त राबविलेली स्वच्छता मोहीम केवळ फोटो इव्हेन्ट?

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : राष्ट्रपिता महात्मा गांधीयांच्या जयंतीचे औचित्य साधून राबविण्यात आलेला स्वच्छता हीच सेवा हा अभिनव उपक्रम केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार रविवारी सर्वत्र मोठ्या हिरीरीने पार पडला. मात्र सध्या हा उपक्रम केवळ फोटो इव्हेन्ट होता की काय? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आढळते.

     शेवगाव नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र आज शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढीगच्या ढीग जसेच्या तसे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

   शहराचा मोठ्या प्रमाणात झालेला भौगोलिक विस्तार व लोकसंख्येतील वाढीमुळे तत्कालीन ग्रामपंचायत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यास अपूरी ठरत असल्याने शेवगाव ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपातर करण्यात आले. मात्र शहराच्या पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छता,  अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट आदि मुलभूत समस्या आजही कायम असल्याने शेवगावची नगरपरिषद कायम चर्चेत राहिली आहे. 

नगर परिषदेच्या स्थापनेनंतर पार पडलेल्या सर्वत्रिक निवडनुकी नंतरचा कार्यकाळ संपून जवळपास तीन वर्षाचा दीर्घ काळ लोटला असतांना नगरपरिषेदीची निवडणूक  या ना त्या कारणांने लांबली. त्यामुळे नगरपरिषदेवर सध्या प्रशासक राज कार्यरत आहे.  प्रान्ताधिकारी प्रशासक म्हणून तर मुख्य आधिकारी हे प्रशासकीय अधिकारी म्हणून तेव्हा पासून कामकाज पहात आहेत.

या कालावधीत तब्बल तीन मुख्याधिकारी नगरपरिषदेला लाभले. प्रशासकाचा एकहाती कारभार असतांनाही जनतेच्या मुलभूत समस्या सोडविण्यात त्यांना अपयश आले. याबाबत शेवटी अर्थ शोध प्रवृतीच प्रबळ ठरली असे मत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.

    शासनाच्या स्वच्छ शहर सुंदर शहर या उपक्रमात शेवगाव शहराचा समावेश होईल तेव्हा होईल. मात्र सार्वजनिक स्वच्छतेतून नागरिकांना दिलासा मिळणे अत्यावशक असतांना शहरात जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग उचलण्याची त्वरित कार्यवाही करून नागरिकाना दिलासा देणे आवश्यक  असल्याची मागणी होत आहे.