येवला प्रतिनिधी, दि. ४ : शेतकऱ्यांच्या हिताच्या समस्या सोडविण्यासाठी आपण शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब डमाळे यांनी केले.
बाबासाहेब डमाळे यांची किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी तर येवला भाजपा मंडल ग्रामीण अध्यक्षपदी प्रा.नानासाहेब लहरे यांची नुकतीच नियुक्ती झाली त्यांचा सत्कार समारंभ अंदरसुल येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता.
याप्रसंगी डमाळे म्हणाले की, शेतकरी अनेक अडचणीला तोंड देत आहे. शासनालाही याची जाणीव आहे. शासनालाही वाटते शेतकरी अडचणीत येऊ नये परंतु शेजारील काही देशांबरोबर यापूर्वी निर्यात- आयात व काही धोरणांवर करार झालेले आहेत त्यामुळे शासनाला ही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
यापूर्वीही अनेक सरकारे आली गेली त्यांनाही शेतकऱ्यांच्या संपूर्ण समस्या सोडविता आलेल्या नाहीत. त्या तुलनेत मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना लागू झालेल्या आहेत. भविष्यातही शेतकरी निश्चित सुखी होईल त्यांच्या समस्या राहणार नाहीत असा आशावाद यावेळी बाबासाहेब डमाळे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रा.नानासाहेब लहरे म्हणाले की, गटा-तटांना आम्ही थारा देणार नाही, आपणही गट-तट बाजूला ठेवून संघटन मजबूत करा, सरल ॲपचे काम नेटाने करा, शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याचे कार्यक्रम पूर्ण करा, एका व्यक्तीला एकच पद मिळते, आपणही संघटनेचे ध्येय धोरणानुसार निश्चित काम केले, मेहनत केली तर आपणही एक दिवस वरिष्ठ पदावर जाऊ शकतो असे शेवटी लहरे म्हणाले.
याप्रसंगी महेश देशमुख, संतोष मुथा, दादासाहेब देशमुख, संजय भोसले, जगदीश पटेल, जगदीश गायकवाड, राजेंद्र सोनवणे, दीपक जैन, किरण धनगे, संदीप गायकवाड, कृष्णा शिनगारे, प्रसाद गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.