कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगांव पिपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान चेअरमन कैलासचंद ठोळे हे होते. प्रारंभीक सभेची नोटीस असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड यांनी वाचून दाखविली. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषय मंजूर करण्यात आले.
विविध विषयांच्या मंजुरीच्या वेळेत झालेल्या चर्चेत सभासद केशवराव भवर, प्रदीप नवले, देवेंद्र वानखेडकर, यांनी सहभाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना मा. चेअरमन कैलासशेठ ठोळे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे यांनी समर्पक उत्तरे दिली.
याप्रसंगी चेअरमन यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम ठेवलेली असुन, बँकेला ऑडीट वर्ग अ प्राप्त झालेला आहे. गुंतवणुक १४४ कोटी व ठेवी २७५ कोटी ठेवीशी गुंतवणुकीचे प्रमाण ५२.३६ टक्के आहे व सी.आर.ए.आर चे प्रमाण १९.८४ टक्के आहे. कर्ज वाटप १६१ कोटी असुन निव्वळ नफा २ कोटी ३७ लाख इतका झालेला आहे. नेट एन.पी.ए. १.०६ टक्के ठेवण्यात बँकेला यश मिळालेले आहे.
बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. परंतु यामध्ये सतत वाढ होण्यासाठी कर्जदारांना आर्थिक शिस्त लागणे महत्वाचे आहे, कर्जदारांना नियमित परत फेडीची सवय लावणे जसे महत्वाचे आहे तसेच आर्थिक नियोजनाचे महत्व देखील पटवून देणे महत्वाचे आहे. त्यासाठी बँकेने “Risk Based Marking” या पध्दतीने आधारीत व्याजदर आकारणी पध्दत सुरू केल्याने, कमी व्याजदर मिळवण्यासाठी कर्जदार आर्थिक शिस्त पाळू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
कोपरगांव सारख्या तालुक्यात बँकेची स्थापना दि. २९.१०.१९४८ साली स्व. मोहनलाल कालिदास व्यास, स्व. डॉ. सी. एम. मेहता, स्व. प्रेमराज पुनमचंद काले यांनी रोवली त्यावेळी अस्तित्वात असलेल्या सुपरव्हिजन कौन्सिलच्या माध्यमातून स्व. धनराज गोकुळचंद ठोळे यांनी देखील यात हातभार लावला व एक नविन आर्थिक संक्रमण या भागात सुरू झाले यातुनच हा आर्थिक वृक्ष स्व. शांतीलालजी प्रेमचंदजी लोहाडे व स्व. रतनचंद फंदुलाल ठोळे यांनी जोपासला व तो समृध्दपणे वाढवीला.
बँकेचे आजी माजी संचालक, कर्मचारी व सभासद यांचे सहकार्यामुळेच बँकेने अमृत महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केलेले आहे. त्याबद्दल त्यांनी आभार मानले. बँकेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सभासद व ठेवीदारांचे आभार मानताना व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जाताना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून बँकेने सन २०२२-२३ मध्ये उल्लेखनिय प्रगती केल्याने बँकेला सहकारातील मानांकित असा “BANCO BLUE RIBBON AWARD- 2023” हा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
बँकेने मोबाईल बँकींग, गुगल पे, फोन पे, क्यु. आर कोड, ए.टी.एम या सारख्या सुविधा चालु केलेल्या असुन लवकरच प्रगत बँका देत असलेली इंटरनेट बँकींग सुविधा देखील खातेदारांना उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
आगामी काळातील बँकींग व्यवसायाचा व सरकारी रोखेंमधील मार्केटचा चढउतार तसेच बँकेला आगामी काळात सभासदांना, ठेवीदारांना व कर्जदारांना इंटरनेट बँकींग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर याचा विचार करता यावर्षी सभासदांना १०% प्रमाणे लाभांश देण्याचा ठराव समंत करण्यात आला आहे . या प्रसंगी सभासद खातेदार यांना आवाहन केले की, बँक देत असलेल्या सुविधेचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या बँकेच्या प्रगतीस हातभार लावुन संस्थेचे नाव उज्वल करावे.
याप्रसंगी सभेस बँकेचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब लोहकरे व सर्व संचालक रविंद्र लोहाडे, धरमकुमार बागरेचा, कल्पेश शहा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, सत्येन मुंदडा, सुनिल बंब रविंद्र ठोळे, दिपक पांडे, सुनिल बोरा, हेमंत बोरावके, वसंतराव आव्हाड, संचालीका सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. त्रिशला गंगवाल तज्ञ संचालक संजय भोकरे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे तसेच बँकेचे कायदा सल्लागार संजीव कुलकर्णी हे उपस्थित होते. संचालक सत्येन मुंदडा यांनी सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानले, सुत्रसंचलन असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड यांनी केले.