पोलीसांचा धाक नसल्याने चोरांचे धाडस वाढले 

पञकार सिध्दार्थ मेहेरखांब यांच्या घराची चोरी

कोपरगाव प्रतिनिधी दि. ६ : कोपरगाव शहरातील शंकरनगर शेजारी राहत असलेल्या पञकार सिध्दार्थ मेहेरखांब यांच्या घराचे कुलुप तोडून गुरुवारीच्या पहाटे चोरट्यानीं रोख रकमेसह सोन्याचा ऐवज लुटला आहे. 

 या घटनेची अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहराला आठ दिवसाड पाणी मिळत असल्याने घरातील पाणी संपल्याने पञकार सिध्दार्थ मेहेरखांब हे आपल्या गावी मुक्कामी गेले तर त्यांची पत्नी व मुलं शहरातील जवळच असलेल्या सासऱ्यांच्या घरी पाठवून दिले. याच दरम्यान घराचा दरवाजा बंद असल्याचे चोरट्यांच्या लक्षात येताच बुधवारच्या मध्यरात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी घराच्या गेटवरुन चढून घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडू घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी सर्वप्रथम मेहेरखांब यांच्या फ्रीजमधील खाद्य पदार्थ खाऊन आरामशीर घरातील कपाट खोलून कपाटातील सोन्याच्या दोन अंगठ्या प्रत्येक  एक तोळ्याच्या व दोन तोळ्याचे गंठण तसेच रोख ६५ हजार रूपये असा अंदाजे ३ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरल्याची माहिती मेहेरखांब यांनी पोलिसांना दिली.

शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला तसेच ठसे तज्ञ व नगरच्या पथकाला पाचारण करून चोरट्यांचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. माञ गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरासह तालुक्यात चोरांचा सुळसुळाट सुरु आहे. पोलीसांचा वचक नसल्याने चोरट्यांची हिंमत वाढत आहे.

या पुर्वी तर चोरट्यांनी पोलीसांच्या गाड्या चोरण्याचा व त्यांच्या गाड्यांचे साहित्य खोलुन नेण्याचा प्रताप केला आहे. आता तर चक्क पञकारांची घरं फोडत असतील तर पोलीसांपेक्षा चोरांची दहशत वाढल्याचे दिसून येत आहे. सिध्दार्थ मेहेरखांब यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.