शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : तालुक्याच्यात मान्सून पूर्व तसेच रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरणीस वेग आला आहे. काही भागात वापसा होताच तालुक्याच्या उर्वरित भागात खरीप पेरण्या पूर्ण होतील. खरीप क्षेत्राच्या ७८% पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले कृषी अधिकारी वैष्णवी घुले यांनी दिली.
यंदाच्या खरीप हंगामासाठी तालुक्याचे खरीप क्षेत्र ८४ हजार ६८८ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी कापूस ३७ हजार हे, बाजरी एक हजार ३०० हे, तुर ७ हजार १०० हे, मूग ४५० हे, उडीद एक हजार ५० हे, भुईमूग १६५ हे, तीळ ५ हे, सूर्यफूल ४ हे, सोयाबीन ३५ हे, मका ३०० हे, चारा पिके एक हजार १६० हे, भाजीपाला १८० हे, फळ पिके ९०१ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्याची नोंद झाली असून याशिवाय तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झालेली आहे. मात्र आता पेरण्या झाल्यावर पावसाची नितांत गरज असतांना त्याने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे.
दरम्यान तालुक्यात यंदाही कापसाची उच्चांकी क्षेत्रात लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. मात्र शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे कपाशीचे बियाणे उपलब्ध होण्याबाबत अडचणी येत असल्याच्या शेतकऱ्यातून तक्रारी आहेत. काही बियाणे विक्रेते मागणीच्या कपाशीच्या बियाणाबरोबर इतर कंपन्यांचे नको असलेले बियाणे माथी मारीत असल्याच्या शेतकऱ्यातून तक्रारी आहेत.
त्यामुळे तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मागणी प्रमाणे संबंधित कंपनीचे कपाशीचे बियाणे त्यांना उपलब्ध होईल या दृष्टीने दखल घेण्याची मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फंदे यांनी दिले आहे. याबाबत दखल घेतली नाही तर अडवणूक करणाऱ्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन पुकारण्याचा निर्धार फुंदे यांनी आपल्या निवेदनाद्वारे व्यक्त केला असून निवेदनाच्या प्रती राज्याचे कृषिमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत .