शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : शेवगाव शहर व तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था मधून शुक्रवारी (दि २१) जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल, आबासाहेब काकडे विद्यालय, पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालय, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल, आदर्श विद्या मंदिर, तसेच नवजीवन विद्यालय दहिगावने, जिजामाता विद्यालय खानापूर, पांडुरंग माध्यमिक विद्यालय वरुर व तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
रेसिडेन्सिअल विद्यालयात बाळासाहेब गव्हाळ यांनी योगाचे महत्व सांगितले. ते म्हणाले, जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ताण तणावाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी योग अभ्यास महत्वाचा असून योग अभ्यास भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे. रोग्याच्या दृष्टीकोनातून योगासने फार महत्वाची आहेत हे शास्त्राने सुद्धा सिद्ध केले आहे. अलिकडे आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे, तणाव घालवून मनाला शांत ठेवणे महत्वाचे आहे, त्यासाठी योगासने करणे महत्त्वाचे आहे.
दीपक महाराज वैद्य यांच्या विशेष योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन यानिमित्त करण्यात आले होते. जनता विद्यालय घोटण येथे त्यांनी विद्यार्थ्यांना योग साधनेचे व प्राणायामाचे महत्त्व पटवून देत ताडासन,वृक्षासन, पादहस्थासन, अर्धचक्रासन, वज्रासन ,वक्रासन, भुजंगासन,शवासन या आसनांचे त्याचबरोबर नाडीशोध प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानस्थिती आदींचे प्रात्यक्षिक शास्त्रीय पद्धतीने कसे करावे याचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करवून घेतले.
संवेदना योगा सेंटर येथे लक्ष्मण महाराज नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिकी कृष्णा डमाळ छोट्या मुलीने विविध योगासने करून दाखवली. तर काकडे विद्यालयात माजी जि प सदस्या हर्षदा काकडे यांनी योगामुळे आपले शरीर, मन व अध्यात्म एकमेकास जोडले जाते तसेच मानवाची शारीरिक, मानसिक, आर्थिक, अध्यात्मिक जडणघडण होते असे प्रतिपादन केले.