सोमैयाची विद्यार्थीनी अनिता कुंभार्डे यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी.

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राच्या विद्यार्थीनी श्रीमती अनिता सूर्यभान कुंभार्डे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा संस्था महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रो. जिभाऊ मोरे,  डॉ. संजय दवंगे, रजिस्ट्रार, डॉ. अभिजीत नाईकवाडे, प्रा. किरण सोळसे आदी प्राध्यापक उपस्थित होते. 

यावेळी प्राचार्य यादव म्हणाले की, “श्रीमती कुंभार्डे यांनी आपले कुटुंब आणि नोकरी सांभाळून 21 व्या शतकातील हिंदीतील महिला लेखिकांच्या आत्मचरित्रांना केंद्रस्थानी ठेवून सद्यस्थितीतील महिलांच्या संघर्षमय जीवनावर संशोधन करून नवीन संशोधक विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.” याही पुढे त्यांचे संशोधन कार्य असेच चालू राहावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

डॉक्टर अनिता कुंभार्डे यांनी “21वीं सदी की प्रतिनिधि महिला लेखिकाओं की आत्मकथाओं में नारी-विमर्श” या विषयावर आपला शोधप्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सादर केला होता.  त्यांना प्रो. अनिता नेरे, प्रो. जिभाऊ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. अनिता कुंभार्डे ह्या सोमैया महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राच्या पीएच.डी. पदवी प्राप्त करणाऱ्या तिसऱ्या संशोधक विद्यार्थिनी आहेत. त्यांनी संशोधनाबरोबरच आपले काही शोधनिबंध विविध राष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रकाशित केले आहेत.  त्या गेल्या काही वर्षांपासून नाशिक येथील ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात हिंदी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.