शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : गेल्यावर्षी शेवगाव तालुक्यातील ४५ हजारावर शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामामध्ये एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता खरीप हंगामात तालुक्यातील सहा मंडळापैकी पाच मंडळात २१ दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून २५% अग्रीम विमा नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र केवळ चार -पाच हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याची माहिती आहे.
तालुक्यात कपाशी व तुरीचे विक्रमी क्षेत्र असताना विमा कंपनीने अग्रीम नुकसान भरपाई मंजूर करताना कपाशी व तुर या पिकाचा समावेश केला नसल्याने तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना अग्रीम नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागले. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेकांनी वेळोवेळी आवाज उठविला. तरीही यंदाचा खरीप हंगाम सुरू होऊन देखील याबाबत काही कार्यवाही झालेली नाही. याबाबत लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करण्याची आवश्यकता होती. जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन राहिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविमा व अग्रीम नुकसान भरपाई मिळण्याबाबत अडचणी आल्या आहेत.
तालुक्यात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामाची पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी जाहीर झाली आहे असून तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला असताना शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतीच्या योजनांचा लाभ मिळणे आवश्यक असताना आजपर्यंत शासनाच्या कोणत्याही सवलतीचा शेतकरी नागरिकांना लाभ मिळालेला नाही.
तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तालुक्याचा नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर केला आहे. तो लाल फीतीत बंद असल्याने शेतकऱ्यात तीव्र नाराजी आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून तातडीने शेतकरी हिताचा निर्णय जाहीर झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्याचा निर्धार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत राज्याचे कृषिमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे कृषी आयुक्त जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सविस्तर निवेदन देण्यात आले असून त्यांचे लक्ष या समस्येकडे वेधण्यात आले असून दिरंगाई झल्यास शेतकरी आंदोलन अटळ असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आले आहे. पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.