उमेदवारांकडून मिळालेल्या पैठणी आणि नथ जाळून महिलांनी नोंदवला निषेध

नाशिक प्रतिनिधी, दि. २५ :  सध्या नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक सुरू असून मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. उद्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी काही उमेदवारांकडून शिक्षक मतदारांना घरातील महिलांसाठी पैठणी आणि नथ देण्यात आल्या. आज मंगळवारी नाशिक येथे महिलांनी या पैठणी आणि नथ जाळून मत विकत घेऊ पाहणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला आहे. शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असून शिक्षकांना व कुटुंबीयांना पैठण्या आणि इतर साहित्य देऊन गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू असून या गोष्टींचा आम्ही निषेध करतो अशा शब्दात महिला शिक्षिकांनी आणि शिक्षक पत्नी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

     नाशिक शिक्षक मतदारसंघात निवडणुक नाट्यमय रंगात आली असून उमेदवार देत असलेल्या प्रलोभनाला महिला भगिनींनी लावलेली आग ही उद्या होणाऱ्या मतदानात कुणा विरोधात भडका करणार हे पाहावे लागेल. मात्र स्वाभिमानी शिक्षिकांनी दाखवलेला हा एल्गार परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल का? कपडे साड्या नथ वाटप करुन शिक्षक विकत मिळतो अशी भावना असणाऱ्या उमेदवारांना हा चाप देण्याचा काम या घटनेमुळे झाले.

महिलांना निकृष्ट दर्जाच्या मिळालेल्या नथ आणि पैठणी यामुळे मोठा उद्रेक निर्माण झाला आहे. आम्ही अंगावरील कपडेही विकत घेऊ शकत नाही का ?अशी तिखट प्रतिक्रिया शिक्षक देऊ लागले आहे. असे प्रलोभने देऊन गुलाम समजण्याचे पाप करणाऱ्या उमेदवाराला ही चिंतेची बाब बनली आहे.