मतदान प्रक्रिया ऑन कॅमेरा करावी – विवेक कोल्हे

 सुज्ञ शिक्षक सदसद्विवेकबुद्धीने मतदान करणार 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये बोगस मतदारांच्या नोंदी सर्वाधिक झाल्या असुन विद्यमान आमदार व महायुतेचे उमेदवार किशोर दराडे यांच्या मतदान केंद्रावर सर्वाधिक बोगस मतदान होण्याची शंका असुन संपूर्ण मतदान प्रक्रिया थेट व्हिडिओ कॅमेरे लावून झाली पाहीजे. सुज्ञ शिक्षक मतदार आपल्या सदसद्विवेकबुद्धीने मतदान करणार आहे असे म्हणत विवेक कोल्हे यांनी बोगस मतदार व मतदान प्रक्रीये बाबत शंका उपस्थित करीत  खळबळ उडवली आहे. 

 प्रसार माध्यमांशी बोलताना नाशिक शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, नाशिक शिक्षक मतदार संघाची हि निवडणुक अंतिम टप्प्यात वेगळ्या वळणावर येवून ठेपली आहे. शिक्षण संस्थांमध्ये जावून विरोधी उमेदवार  स्वताच्या राजकीय  फायद्यासाठी शिक्षकांना साड्या, कपडे, नथ वाटप करत आहेत. शाळेतील मुलांच्या समक्ष हे वाटप केले जात असुन त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होवू शकतो. ही लढाई असत्त्या विरूद्ध सत्त्याची, अन्यायाविरुद्ध न्यायाची,  बोगस शिक्षक मतदारा विरुन खऱ्या शिक्षकांची आणि गुलामी विरुद्ध सन्मानाची लढाई आहे.

या लढाईत सुज्ञ शिक्षक योग्य पर्याय सदसद्विवेकबुद्धीने निवडतील अशी आशा कोल्हे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, हि निवडणूक चुकीच्या दिशेने नेण्याचा  प्रयत्न करीत आहेत. प्रांत वाद, जातीवाद अशा अनेक गोष्टी आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केला जातोय. शासकीय कार्यालयात विद्यमान आमदार निवडणुकी संदर्भात बैठका वर बैठका घेतात तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. बोगस मतदारांच्या नोंदी झाल्या. उघडपणे पैसे, वस्तू वाटप सुरु आहे.

यावरुन  सध्या लोकशाही अस्तित्वात आहे की नाही अशी शंका येत आहे. बोगस मतदान होण्याची शक्यता दाट आहे तेव्हा व्हिडिओ शूटिंग द्वारे मतदान केंद्रावर मतदान झाले पाहीजे अशी मागणी आपण निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रारी द्वारे केल्याचे कोल्हे यांनी सांगितले.  कोल्हे यांना शिक्षकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधी उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे  ते चुकीच्या मार्गाने मतदान प्रक्रिया करून घेवू शकतात असेही शेवटी कोल्हे म्हणाले.

आमदार दराडे यांनी शिक्षकांना गुलाम म्हणुन शिक्षण क्षेञात मोलाचे योगदान देणाऱ्या सावित्रीबाई फुले, साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अनेक महापुरुषांचा अवमान केला आहे. त्याबद्दल किमान दराडेंनी दिलगिरी व्यक्त केली नाही अशी खंत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.