गरजू लाभार्थ्यांना विहीर, गायगोठा, घरकुल योजनेचा लाभ मिळावा – कैलास राहणे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : शासनाने बदल केलेल्या नियमानुसार ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर, गायगोठे योजना सुरू आहे. यातील जाचक अटी कमी झाल्याने जास्तीत जास्त शेतकरी आणि गरजू लाभार्थी यांना त्याचा लाभ मिळावा अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी केली आहे.

विविध योजना संदर्भात पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेत शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. दोन विहिरीतील अंतर आणि एका गावात लाभार्थी संख्या मर्यादित होती मात्र आता त्यातील अटी शिथील झाल्या आहेत. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी शासनाला केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक सकारात्मक बदल योजनांच्या लाभार्थी नियमावलीत झाले आहे.

त्यामुळे अंजनापुर, रांजणगाव, धोंडेवाडी, बहादरपुर, जवळके, वेस सोयेगाव, मनेगाव, बहादराबाद या ठिकाणी विहीर होण्यास अनेक लाभार्थ्यांना फायदा झाला. काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी या भागाचा डार्क झोनमद्ये समावेश झाला त्यामुळे सदर शेतकरी विहिरी पासून वंचित आहे. त्या गावांचा ग्रीन झोनमद्ये समावेश व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यासह घरकुलाचे देखील अनेक लाभार्थी पात्र असूनही अद्याप त्यांना लाभ मिळत नाहीये यावर काम होणे अपेक्षित आहे. घरकुल बांधण्यासाठी सरकार अनुदान देते. राज्य सरकारने नव्याने ओबीसी साठी नवीन योजना आणली. ड वर्ग यादीतील पात्र लाभार्थी (एम1), ऑटो रिजेक्ट असणारे (एम 2) आणि ज्यांच्याकडे ओबीसी दाखला आहे (एम 3) असे सर्व लाभार्थी मिळून एम 4 यादी एकत्र तयार आहे. त्यातून गरजू आणि गरीब कुटुंबाला लाभ देऊन पात्र लाभार्थी यापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न व्हावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.