शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : अखेर अनेक जवळच्या बिनीच्या कार्यकर्त्याचा आग्रह लक्षात घेऊन घुले बंधूनी शेवगाव – पाथर्डी मतदार संघात परिवर्तन जनसंवाद अभियान सुरु करून आपल्या चाहत्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
काही दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्यात माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व डॉ. क्षितीज घुले यांनी चाचपणी करत जनतेचा कानोसा घेत फेर फटका मारला होता. तर गेल्या तीन दिवसात परिवर्तन जनसंवाद अभियान सुरु करून शेवगाव तालुक्यातील ढोरसडे तसेच काल सोमवारी (दि. १ ) शेवगावात कार्यकर्त्याचा मेळावा संपन्न झाला आहे. तर उद्या पूर्वभागातील मुरमी, शेकटे व बाड गव्हान येथे परिवर्तन जनसंवाद अभियाना निमित्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
परिवर्तन जनसंवाद अभियानाचा सिलसिला जोरात सुरु झाला. यावरून विधानसभेच्या होणाऱ्या रणधुमाळीत घुले बंधू कंबर कसून उतरणार हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात माजी आमदार नरेंद्र पाटील घुले व चंद्रशेखर घुले पाटील व माजी सभापती डॉ. क्षितिज घुले या तिघांची एकत्रित हजेरी लक्षणिय व चर्चेची ठरली आहे. त्यामुळे विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उप सरपच, सदस्य सेवा संस्थाचे पदाधिकारी उत्स्फूर्त रित्या मोठया संख्येने उपस्थिती लावत आहेत.
मेळाव्यात शेवगावच्या परिपूर्ण विकासासाठी आपल्या हक्काचा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठविण्यासाठी सर्वांनी कामाला लागा असा संदेश देण्यात येत आहे.