श्रीराम अक्षता कलशाची संवत्सरला मोठ्या उत्साहात स्वागत

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : अयोध्येतील मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी भगवान प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या निमित्ताने देशभरात घरोघरी निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षता मंगल कलशाचे रविवारी संवत्सर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पंचक्रोशीतील असंख्य नागरीक याप्रसंगी उपस्थित होते.

संवत्सर येथील श्री मारुती मंदिरापासून दुपारी ढोल ताशांच्या गजरात फुलांनी सजविलेल्या पालखीतून कलशाची शोभायात्रा काढण्यात आली. पालखी मार्गासह गांवातील प्रमुख रस्त्यावरुन निघालेल्या या शोभायात्रेचा श्री शनी महाराज मंदिराजवळ समारोप झाला. शोभायात्रेच्या अग्रभागी प्रभू श्रीरामाची मूर्ती, पारंपारिक सनई, ढोल ताशाचा गजर, लेझीम, झांजरी वाद्यांचा गजर व जय श्रीराम नामाचा जयघोष करीत पंचक्रोशीतील अनेक महिला-पुरुष, युवक-युवती तसेच मंगल कलश डोक्यावर घेतलेल्या महिला, तरुणी, सफेद वस्त्र व भगव्या टोप्या घातलेले ग्रामस्थ, भजनी मंडळ, प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांचा पोषाख परिधान केलेले बालगोपाल सहभागी झाले होते.

अयोध्येहून आलेल्या या अक्षता मंगल कलशाची विधीवत पूजा करत व पुष्पवृष्टी करत ग्रामस्थ व रामभक्तांनी ठिकठिकाणी, चौकाचौकात स्वागत केले, रस्त्यारस्त्यांवर सडे, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. संपूर्ण गाव राममय होऊन गेले होते. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संवत्सर परिसरातून भावीक मोठ्या संख्येने जाणार आहेत.

शोभायात्रेनिमित्त संवत्सर येथे आलेले संगमनेरचे प्रा.एस.झेड.देशमुख सर, कुंभारीचे ह.भ.प.राघवेंद्र महाराज, ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव यांचे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत केले. प्रा. देशमुख यांच्यासह ह.भ.प.राघवेंद्र महाराज, राजेश परजणे, तेजस्वीनी साबळे यांनी मनोगते व्यक्त केली.

शोभायात्रेत संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे, कोपरगाव बाजार समितीचे संचालक खंडू फेपाळे, लक्ष्मण साबळे, सोमनाथ निरगुडे, शंकर परजणे, दिलीप तिरमखे, व्यंकटेश बारहाते, शिरीष लोहकणे, दिलीप ढेपले, बाळासाहेब दहे, शिवाजी गायकवाड, राजेंद्र नवाळे, पांडुरंग शिंदे, योगेश गायकवाड, नामदेव पावडे, बाबुराव मैंद, भरत साबळे, सुभाष बिडवे, अर्जुन तांबे, शैलेश जोशी, तुषार बारहाते, तुषार बिडवे यांच्यासह ग्रामस्थ तसेच रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.