शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक संघटनेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार उत्तम मुंढे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार, प्रदेश आध्यक्ष खा.सुनिल तटकरे, यांच्या आदेशान्वये पक्षाच्या युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मुंढे यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र मुंबई येथे नुकतेच दिले आहे.
राष्ट्रवादी युवक संघटनेचे नुतन जिल्हाध्यक्ष मुंढे हे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे यांचे निकटवर्ती कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सध्या ते राष्ट्रवादी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तालुक्यातील पिंगेवाडी ग्रामपंचायतीच्या दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंढे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मंडळाने दणदणीत विजय मिळवून विरोधकांच्या गेल्या अनेक वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावण्यात यश मिळविले असून तळागाळात काम करण्याच्या त्यांच्या कार्याची नोंद पक्षाने घेतली आहे.
त्यांच्या या निवडीचे पारनेरचे आमदार निलेश लंके, नगरचे आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, श्रीगोंद्याचे बाळासाहेब नहाटा, राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नितेश नहाटा, बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे स्वागत करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
युवक संघटनेचे नुतन जिल्हाध्यक्ष मुंढे यांना पारनेर येथे आमदार लंके यांचे हस्ते तर नगर सावेडीत, शिरूर, पिंगेवाडी, शेवगावात ठिकठिकाणी मुंढे मित्रमंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. ठिकठिकाणच्या सत्काराला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष मुंडे यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक संघटनेची भक्कम बांधणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.