दुबई मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक डॉ. काटे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शेवगाव चे भुमिपूत्र उद्योजक, अर्थतज्ञ डॉ.डी. एस. काटे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल विविध स्थरातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले आहे. छत्रपती संभाजीनगर मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे ५ ते १० डिसेंबर २०२४ दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होत आहे.

  या  साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील प्रथितयश उद्योजक व अर्थतज्ज्ञ डॉ. काटे यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ.महेश खरात यांनी नुकतेच जाहीर केले आहे. डॉ .काटे हे  १९८५ साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून स्थापत्य अभियंता पदविका घेऊन नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करणारे उद्योजक तसेच अर्थतज्ज्ञ व सिद्धहस्त लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. 

व्यवसायाच्या माध्यमातून व्याख्याने व शिबिरांद्वारे रोजगार निर्मिती व मार्गदर्शन ते सातत्याने  करत असतात. साहित्य, कला, क्रीडा व समाजसेवा या गोष्टीची त्यांना आवड आहे. महाविद्यालयीन काळात संसदेचे सचिव म्हणून ते निवडून आले होते. अर्थक्रांती चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते.

  अर्थ योग, अर्थ दिशा, अर्थ जागर अर्थसंपदा, अर्थनीती ही त्यांची  गाजलेली ग्रंथ संपदा आहे. महात्मा गांधीचे अर्थ विचार हा त्यांच्या चिंतनाचा प्रांत आहे. संत चोखोबा ते संत तुकोबा, एक वारी समतेची, मंगळवेढा ते देहू संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात शब्दगंध साहित्य परिषदेचा शब्दगंध उद्योजकता गौरव पुरस्कार, विश्व समाज भूषण पुरस्कार, आदर्श भूमिपुत्र गौरव पुरस्कार, जेके जाधव साहित्य पुरस्कार असे राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

त्यांची दुबई येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे, असे सदर बैठकीत ठरले.
सदर बैठकीला डॉ. संतोष देशमुख, प्राचार्य डॉ. रामकिशन दहिफळे, प्रिया धारूरकर, डॉ. निलेश देगावकर, हनुमंत सोनवणे, डॉ. संभाजी पाटील, डॉ. किसन माने आदी उपस्थित होते.