शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : आषाढी एकादशी निमित्त भाविकांना पंढरपूरला श्री पांडुरंगाच्या वारीला जाण्यासाठी दिनांक १३ ते २२ जुलै या कालावधीत राज्य परिवहन मंडळाच्या शेवगाव आगाराच्या वतीने तालुक्यातील कोणत्याही गावातून ४४ भाविकांनी मागणी केल्यास ‘ थेट गावातून पंढरपूर यात्रेसाठी बस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या मोहीमे अंतर्गत प्रवास करणाऱ्या ७५ वर्षांवरील भाविकांना पूर्ण प्रवास मोफत व ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील भाविकांना पन्नास टक्के सवलती मध्ये तसेच महिला भाविकांना सरसकट पन्नास टक्के सवलतीत प्रवास योजना लागू राहणार आहे. त्यामुळे आपल्या गावातून थेट पंढरपूर येथून दर्शन घेवून पुन्हा गावात आणून सोडण्यात येणार असून शिवाय उपरोक्त सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
एसटी राबविणार असणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाची माहिती शेवगाव तालुक्यातील गावोगावच्या ग्रामपंचायतीना पत्राद्वारे देण्यात आली असून या सवलतीचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांनी केले आहे. एसटी बुक करण्यासाठी स्थानक प्रमुख किरण शिंदे यांच्या दूरध्वनी क्रमांक 9850121196 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.