तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता – आमदार काळे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांचा निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास महायुती शासनाने मंजुरी दिली आहे. 

कोपरगाव मतदार संघाच्या सीमेवरील असलेल्या तीळवणी लगतच्या गावातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी तीळवणी याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे होते. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा नियोजन बैठकीत मान्यता देण्यात आली होती. मात्र जिल्हा नियोजन समितीची मान्यता मिळाल्यानंतर मंत्रालय स्तरावर मान्यता मिळणे आवश्यक होते व त्यांनतरच निधीची तरतूद होणार असल्यामुळे आशुतोष काळे यांचा आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरूच होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी दिली आहे. 

त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. तिळवणी प्रथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तिळवणीसह कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव आदी कोपरगाव तालुक्यातील गावांसह वैजापूर तालुक्यातील नजीकच्या गावातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.