विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांवर चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ – सिद्धार्थ साठे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : शहरात दिवसेंदिवस रस्ते, वीज, पाणी या मूलभूत प्रश्नांची वाढ होत असून विद्यमान आमदार आशुतोष काळे हे निष्क्रिय असल्याची पावती त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने चिखलात बसून आंदोलन करत दिली आहे. एकीकडे हजारो कोटींच्या वल्गना दुसरीकडे मात्र जनता समस्यांनी बेहाल अशी परिस्थिती पाच वर्षे झाली असल्याची घणाघाती टीका भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे यांनी आमदार काळे यांच्यावर केली आहे.

नागरीकांना केवळ भूलथापा मिळाल्या. एकही ठोस काम पूर्णत्वास गत पाच वर्षात गेले नाही हे वास्तव आहे. याचा प्रत्यय राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यांना आला असून त्यांना प्रभागातील एक रस्ता पाच वर्षात झाला नाही यासाठी चिखलात बसण्याची नामुष्की ओढवली आहे. आमदार काळे जर एवढे निधी आणल्याची वाच्यता करतात, फलकबाजी करतात तर एक साधा प्रभागातील रस्ता का झाला नाही याची खंत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आहे. नगरपालिकेला विविध माध्यमातून नियमित मिळणारा निधी देखील माझ्यामुळे आला असे नसलेले श्रेय घेऊन काळे यांनी मोठा गाजावाजा करण्यातच धन्यता मानली.

शहरातच नाही तर ग्रामीण भाग देखील असाच होरपळला जातो आहे.नुकतेच शासनाने दहा कोटी निधी दिलेला खर्च झाला असताना पोहेगाव रस्ता काहीच दिवसात खड्डेमय झाला त्याचे गौडबंगाल काय ? हे त्या भागातील लोकांना कळून चुकले आहे. आ.काळे यांनी शहराच्या पाण्याच्या बाबतीत देखील केलेला हलगर्जीपणा पाणी संकटाकडे शहराला लोटणारा आहे. केवळ आश्वासने देऊन विकास होत नाही. कोट्यवधी रुपये निधीची तरतूद प्रत्येक सरकार करत असते पण तो निधी प्राप्त होतोच असे नाही तर त्यातील काही प्रमाणात निधी प्रत्यक्ष विकासाला प्राप्त होतो याकडे साफ दुर्लक्ष करून निव्वळ जनतेला झुलवत ठेवण्याचे काम काळे यांनी केले आहे.

स्वतःचे पदाधिकारी चिखलात बसून आंदोलन करत असतील तर हे अपयश आमदार म्हणून नैतिक दृष्ट्या आशुतोष काळे यांचे आहे. केंद्रीय योजना आणि शासनाने द्याव्या लागणाऱ्या नागरिकांच्या हक्काच्या योजनांचे श्रेय घेण्यात धन्यता मानली, पण प्रत्यक्ष जनतेचे प्रश्न त्यांच्या सोयीच्या ठेकेदारी प्रवृत्तीमुळे सुटले नाही याचा विचार आमदार साहेबांनी करावा असा खोचक सल्ला देखील साठे यांनी शेवटी दिला आहे.